Kirit Somaiya Live Updates : भाजप नेते किरीट सोमय्या आज काय भूमिका घेणार?
मंत्री अनिल परब यांचा रिसॉर्ट तोडण्यासाठी निघालेल्या भाजप नेते किरीट सोमय्यांना काल पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्यांची सुटकाही करण्यात आली. आज सोमय्या काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.

पार्श्वभूमी
Kirit Somaiya : भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) हे आक्रमक झाल्याचे दिसत आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (anil parab) यांच्या अनधिकृत रिसॉर्टवर प्रकरणावरुन त्यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा...More
परिवहन मंत्री अनिल परब यांचा रिसॉर्ट तोडण्यात यावा या मागणीसाठी निघालेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांना काल पोलिसांनी अटक केली होती. त्यामुळं काल दिवसभर राजकीय नाट्य घडल्याचे पाहायला मिळाले. उशीरा रात्री पोलिसांमनी त्यांची सुटका केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सोमय्या यांनी पुढच्या आठवड्यात आणखी तिघांवर कारवाईचा इशारा सोमय्यांनी दिला आहे. दरम्यान, दापोलीतल्या रिसॉर्टकडे निघालेल्या किरीट सोमय्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडलं. त्यानंतर भाजप समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून सोमय्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले.
अनिल परब यांचं कथित रिसॉर्ट पाडण्याच्या मागणीसाठी भाजप नेते किरीट सोमय्या आणि माजी खासदार निलेश राणे काल दापोलीत दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी दापोली पोलिसांकडे एफआयआर नोंदवण्याची मागणी केली. मात्र, पोलिसांनी एफआयआर नोंदवला नाही आणि रिसॉर्टकडेही जाऊ दिलं नाही. त्यामुळं सोमय्यांनी पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या मांडला. मात्र त्याचीही दखल पोलिसांनी घेतली नाही. शेवटी सोमय्या आणि निलेश राणे आपल्या कार्यकर्त्यांसोबत चालत परबांच्या कथित रिसॉर्टकडे निघाले. थोडे दूर गेल्यावर पोलिसांनी सोमय्या आणि राणेंना अडवलं. तेव्हा पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळाला. पोलिसांनी टाकलेले बॅरिकेट्स ओलांडून जाण्याचा प्रयत्न भाजप कार्यकर्ते करत होते. त्यावेळी पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना मागे रेटण्याचा प्रयत्न केला. शेवटी कायदा आणि सुव्यवस्था भंग केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी किरीट सोमय्या, निलेश राणे आणि निल सोमय्या यांना अटक केली. त्यानंतर त्यांना रत्नागिरी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलंय.