लातूर: तुम्हाला कुणी चित्रपटामध्ये काम देण्यासाठी ऑफर देत असेल तर जरा सावध राहा कारण लातूरमध्ये चित्रपटात काम देण्याच्या बाहण्यानं दोन अल्पवयीन मुलींचं अपहरण केल्याचा दावा केला जातो आहे.


फिल्मी दुनियेत नाव कमवावं असं कुणाला वाटत नाही. लातूरमधल्या दोन मुलींनीही मोठी स्वप्नं पाहिली. पेपरात जाहिरात वाचली आणि गाठला राहुल खडके आणि विजय खडकेचा अॅक्टिंगचा कारखाना.

रितसर स्क्रीन टेस्ट घेतली. ऑडिशन झाली, इंटरव्ह्यू झाला आणि दोघींचीही नव्या फिल्मसाठी निवड केली. थेट हिरोईन म्हणून निवड झाल्यानं दोघीही हवेत होत्या.

राहुल आणि विजयनं एके दिवशी शूटिंगच्या बहाण्यानं दोघांना बाहेरगावी नेलं. पण दिवसभर मुली घरी न परतल्यानं कुटुंबीयांनी थेट पोलिसात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोघा भावांच्या मुसक्या आवळल्या.

फक्त लातूरमध्येच नाही, तर मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यात या अॅक्टिंगच्या बनावट कारखान्याचा सुळसुळाट झाला आहे. चित्रपट महामंडळाची परवानगी न घेता, असे ठग राजरोसपणे दुकानं थाटून बसले आहेत.

सैराटमध्ये नागराजने रिंकू राजगुरु, आकाश ठोसरसह अख्ख्या फिल्ममध्ये नवखे कलाकार घेतले. त्यामुळे आपणही अॅक्टर होऊ शकतो.  असं अनेकांना वाटू लागलं. पण प्रत्येक फिल्ममेकर हा नागराज नसतो. या चंदेरी दुनियेचं आकर्षण असणं स्वाभाविक आहे. पण त्यात उतरताना अभिनयाच्या ज्ञानासोबत थोडं भानही राखणं आवश्यक आहे.