नवी मुंबई खारघरमधील महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) प्रदान सोहळ्यात उष्माघातामुळे झालेल्या 14 श्रीसदस्यांच्या मृत्यू  झाल. या प्रकरणी आणखी एक  माहिती समोर आली आहे.  खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रमाला व्यवस्थापकांनी महानगरपालिकेची कोणतीही परवानगी घेतली नसल्याची बाब माहिती अधिकारात प्राप्त झाली आहे 


सांगली येथील सुयोग ओंधकर  यांनी माहिती अधिकारात खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रमाला व्यवस्थापकांनी महानगरपालिकेची कोणतीही परवानगी घेतली होती की नव्हती या संदर्भात माहिती मागविली होती. यानंतर पनवेल महानगरपालिकेकडून सदर कार्यक्रमाच्या परवानगीच्या कागदपत्राची कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे उत्तर देण्यात आली. थोडक्यात जर व्यवस्थापकांनी कार्यक्रमासाठी परवानगी मागण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला असता तर त्याची माहिती मिळाली असती परंतु सध्या महानगरपालिकेकडे या संदर्भात कोणतीही माहिती नाही. 


16 एप्रिल रोजी खारघरमधील सेंट्रल पार्क इथं झालेल्या या भव्यदिव्य सोहळ्यात लाखोंच्या संख्येनं राज्याच्या कानाकोप-यातून धर्माधिकारी यांचे श्रीसदस्य जमा झाले होते. यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते देण्यात आला. या सोहळ्याला अंदाजे 20 लाख लोकांनी उपस्थिती लावली होती. यापैकी अनेक जण आदल्या रात्रीपासून तर काही जण एक दिवस आधीच त्या मैदानात दाखल झाले होते. कार्यक्रम सकाळी साडे 10 ते दुपारी दीड वाजेपर्यंत सुरू असल्यानं प्रचंड उष्माघातामुळे तिथं उपस्थित अनेकांना त्रास झाला ज्यात 14 जणांचा मृत्य झाला. या घटनेनंतर राज्य सरकारनं संबंधित श्रीसदस्यांच्या कुटुंबियांना तातडीनं आर्थिक मदत जाहीर केली. मात्र यादुर्घटनेस जबाबदार कोण? असा सवाल विरोधी पक्षाकडून उपस्थित केला गेला होता. याशिवाय या कार्यक्रमासाठी अंदाजे 14 कोटी रूपये शासनाच्या तिजोरीतून खर्च केल्याचा आरोपही केला जातोय. 


इतक्या मोठ्या संख्येनं लोकं येणं अपेक्षित असताना कार्यक्रमाचं ढिसाळ आयोजन, उन्हापासून संरक्षण देणाऱ्या व्यवस्थेचा अभाव, पाणी, वैद्यकीय सुविधा या दुर्लक्ष असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले गेले होते. महाराष्ट्र भूषण हा शासकीय पुरस्कार असल्यामुळे जनतेचा पैसा यामध्ये अयोग्य पद्धतीने वापरला असा आरोप याचिकेत केला होता. आगामी निवडणुकांमध्ये राजकीय फायद्यासाठीच हा सारा घाट घातल्याचा आरोप देखील करण्यात आला होता. याशिवाय समोर आलेल्या काही छायाचित्रातून कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित श्रीसदस्यांची गैरसोय आणि अडचण होत असताना कार्यक्रमाला उपस्थित अतिमहत्त्वाच्या व्यक्ती सुरक्षित ठिकाणी वातानुकुलित शामियात जेवत होती असा आरोपही करण्यात आला होता. 


हे ही वाचा :


Maharashtra Assembly Session : खारघर दुर्घटनेचा मुद्दा विधानपरिषदेत उपस्थित, सत्ताधारी-विरोधकांमध्ये खडाजंगी, सभागृहात सुधीर मुनगंटीवार यांनी दिली महत्त्वाची माहिती