नवी मुंबई : खारघरमधील पूर्वा प्ले स्कूलच्या पाळणाघरात चिमुकलीला बेदम मारहाण केल्याप्रकरणी, मालकीण प्रियांका निकम आणि आया अफसाना शेख यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खारघर पोलिस स्टेशनमध्ये दोघींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे घटना?

खारघर सेक्टर 10 मध्ये पूर्वा प्ले स्कूल आणि नर्सरी आहे. या ठिकाणी काही चिमुकली पाळणाघरात आहेत. पाळणाघरातील आया अफसाना नासीर शेखने रितीशा नावाच्या दहा महिन्यां चिमुकलीला क्रूरपणे मारहाण केली. ज्यात मुलीच्या डोक्याला जखम झाली आहे. तिला उपचारासाठी वाशीच्या फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शेकापकडून पाळणाघराची तोडफोड

दरम्यान चिमुकलीला मारहाण केल्याप्रकरणी शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झाला आहे. शेकापच्या कार्यकर्त्यांनी पूर्वा प्ले स्कूलची तोडफोड केली.

पाळणाघरातील प्रकार घृणास्पद, या प्रकरणात स्वत: लक्ष घालणार: पंकजा मुंडे


 

पोलिसांचा हलगर्जीपणा

पोलिसांनी या तपासात अक्षम्य हलगर्जीपणा केल्याचं समोर येतं आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी तब्बल बारा तास लावले. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं नाही. उलट पोलिस स्टेशनमधील धोपटे साहेब म्हणाले की, तुम्हाला ज्यांच्याकडे माझी तक्रार करायचीय, त्यांच्याकडे करा, मी कोणालाही घाबरत नाही, असा आरोप मुलीची आई रुचिता सिन्हाने केला आहे. शिवाय, कोपरा गावातील स्थानिक आरोपीला मदत करत असून, स्थानिक गुंडाच्या पीडित मुलीच्या पालकांना धमक्या येत आहेत.

 

पाळणाघरातील मारहाण प्रकरणी पोलिसांचा हलगर्जीपणा उघड


 

पाळणाघरातील चिमुकल्यांना ड्रग्ज किंवा गुंगीचं औषध दिलं?

पाळणाघरातील चिमुकल्यांना काहीतरी ड्रग्ज किंवा गुंगीचं औषध दिलं जात असल्याचा संशय पालकांनी व्यक्त केला आहे. कारण चिमुकलीला मारहाण होत असताना इतर लहान मुलं शांत, चिडीचूप झोपलेली दिसतात.

VIDEO: दहा महिन्याच्या चिमुकलीला पाळणाघरात अमानुष मारहाण


 

महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडेंकडून दखल

पाळणाघरात चिमुकलीला केलेल्या मारहाण प्रकरणाविषयी बोलताना मंत्री पंकजा मुंडेंनी संताप व्यक्त केला. "हा अतिशय घृणास्पद प्रकार आहे. हे पाळणाघर खासगी होतं की त्यासाठी त्यांनी कोणती परवानगी घेतली होती, याची चौकशी करण्यात येईल. तसेच इथे नियमांचं उल्लंघन झालं का याबाबतही चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान संबंधित महिलेवर कडक कारवाई केली जाईल. तिथल्या पोलिस अधिकाऱ्यांशीही बोलून मी स्वत: या प्रकरणात लक्ष घालणार आहे." अशी प्रतिक्रिया याप्रकरणी पंकजा मुंडेंनी दिली आहे.

व्हिडीओ :