मुंबई: केतकी चितळेने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेली ती वादग्रस्त पोस्ट ही 2020 सालची असल्याचं समोर आलं आहे. त्यावेळी ही पोस्ट तितकी व्हायरल झाली नव्हती, मग आता ती रीपोस्ट करून व्हायरल करण्यामागे काही षडयंत्र आहे का याचा तपास ठाणे पोलीस करत आहेत. 


संबंधित पोस्ट ही 2020 सालीच करण्यात आली होती. पण त्यावेळी पोस्ट करणाऱ्यांना अपेक्षित अशी ती व्हायरल करता आली नव्हती. मग आता ती केतकीच्या माध्यमातून व्हायरल करण्यात आली आहे की? त्यामागे काही षडयंत्र आहे का? याचा तपास आता ठाणे पोलिसांनी सुरू केला आहे. 


केतकी चितळे ही वादग्रस्त अभिनेत्री आहे. तिने या आधी अनेक वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. म्हणूनच तिच्या माध्यमातून आता ही पोस्ट पुन्हा एकदा रीशेअर करण्यात आली असल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी या दृष्टीने तपासकार्य सुरू केलं आहे. 


दरम्यान, शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळेला अटक करण्यात आली आहे. केतकीविरुद्ध कळवा पोलिस ठाण्यात कलम 500, 505(2), 501 आणि 153 A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्निल नेटके यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी पुण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुणे सायबर विभागाकडे तक्रारी दाखल केली. 


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात समाजात द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा पोलिसांना संशय आहे. संबंधित पोस्ट ही 2020 सालीच काही क्लोज व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यानंतर इतर माध्यमातूनही व्हायरल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण त्यावेळी अपेक्षित यश आलं नव्हतं. त्यामुळे आता केतकीच्या माध्यमातून परत एकदा व्हायरल करण्यात आली आहे असा संशय पोलिसांना आहे. केतकीच्या मागे कोण आहे याचा तपास पोलीस करत आहेत. नाशिकच्या पोस्टशी केतकीच्या पोस्टचा काही संबंध आहे का याचाही तपास केला जात आहे