Ujani Water Issue : उजनी धरणातील पाणी प्रश्नावरुन सध्या चांगलच वादंग निर्माण झालं आहे. उजनीचे पाणी बारामती, इंदापूरला देण्याला जोरदार विरोध होताना दिसत आहे. आज उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीनं सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या मंदिरात आरती करण्यात आली. या सरकारला सद्बुद्धी येवो अशी प्रार्थना देखील यावेळी करण्यात आली. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून उजनी धरणतील पाण्यावर दरोडा टाकला जातोय. 'आज आरती केली आहे पण येणाऱ्या काळात भरणे मामांच्या नावाने शांती करणार' असल्याचा इशारा यावेळी उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खुपसे यांनी दिला.
पालकमंत्र्यांना सिद्धेश्वर महाराजांनी सद्बुद्धी द्यावी यासाठी आज आम्ही मंदिरात प्रार्थना केली. काल पंढरपूरच्या चंद्रभागेत आंदोलन करुन पाणी प्रश्नांविषयी आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. आम्ही आतापर्यंत गांधींगिरी करत शांत पद्धतीने आंदोलन करतोय. पण यापुढील आंदोलन हे भगतसिंग यांच्यासारखे असेल असा इशारा देखील खुपसे यांनी यावेळी दिला. आज आरती केली आहे, येणाऱ्या काळात भरणे मामांच्या नावाने शांती करणार आहोत, असेही ते म्हणाले. जुन्या योजनेच्या नावाने तीच योजना पुन्हा रेटली जात आहे. हे आंदोलन कुठल्या एका पक्षाचे किंवा व्यक्तीचे नाही हेच सर्वसामान्य लोकांचे आंदोलन आहे. सर्वपक्षीय लोक आजच्या आंदोलनात पक्षीय झेंडा बाजूला ठेवून सहभागी होत आहेत.प्रत्येकानं या आंदोलनात सहभागी व्हावं असे आवाहन यावेळी खुपसे यांनी केलं आहे.
राज्य सरकारने लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेला प्रशासकीय मान्यता दिली आहे. या माध्यमातून इंदापूर आणि बारामती तालुक्याला पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून इंदापूर आणि बारामती तालुक्यातील एकूण 17 गावासाठी पाणी पुरवठा केला जाणार आहे. या सिंचन योजनेमुळे 7 हजार 250 हेक्टर अवर्षणप्रवण शेती क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे नियोजन आहे. यासाठी जवळपास 0.90 अब्ज घनफूट पाणी उपसा करणे प्रस्तावित आहे. या योजनेसाठी 348 कोटी 11 लाख रुपयांच्या अंदाजपत्रक किंमतीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. मात्र या योजनेस सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आणि काही राजकीय लोकांचा विरोध आहे.
नेमकी काय आहे लाकडी निंबोडी योजना ?
- या योजनेमुळे इंदापूर तालुक्यातील 10 गावांमधील 4337 हेक्टर क्षेत्र व बारामती तालुक्यातील 7 गावांमधील 2913 हेक्टर क्षेत्र एकूण 7250 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.
- लाकडी-निंबोडी ही योजना या परिसरासाठी महत्वाची आहे. ही योजना 30 वर्षांपासून रखडली होती.
- लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजना ही भीमा (उजनी) प्रकल्पाचाच भाग असल्याने सदर योजनेस प्राधिकरणाच्या मान्यतेची आवश्यकता नाही
- निंबोडी उपसा सिंचन या योजनेस एकूण 348 कोटी 11 लाख इतक्या किंमतीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता
- इंदापूर तालुक्यातील कुंभारगांव परिसरातून साधारण 765 हाँर्स पॉवर क्षमतेच्या चार विद्युत पंपाच्या साहाय्याने हे पाणी उचलून शेटफळगडे आणि निरगुडे च्या सीमेवर टाकले जाईल.
- 640 हॉर्स पॉवरचे 3 पंप व 570 हॉर्स पॉवरचे दोन विद्युत पंप त्या ठिकाणी बसवले जातील.
- इंदापूर आणि बारामती तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यातील 11 हजार एकर शेती ओलिताखाली येईल.
- लाकडी निंबोडी योजना जुनी आहे. मागच्या वर्षी वर्षी उजनी धरणातील 5 टीएमसी पाणी इंदापूर तालुक्याला देण्याचा निर्णय झाला त्याला सोलापूरकरांनी विरोध केला त्यामुळे ती योजना रद्द करण्यात आली आहे.
दरम्यान, लाकडी निंबोडी योजना ही जुनी योजना आहे. सोलापूर जिल्ह्यात लोकांचा गैरसमज काढला पाहिजे, इंदापूर तालुक्यातील लोकांचे हक्काचे पाणी इंदापूरकारांना देत आहोत असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत व्यक्त केलं होतं. त्यामुळे आता उजणीच्या पाणी प्रश्नावरुन चांगलेच वातावरण तापले आहे.