पंढरपूर : राज्यात सत्तांतर झाले आहे याची जाणीव अजूनही अधिकाऱ्यांना झालेली नसून त्यांनी आपली मानसिकता बदलावी असा इशारा राज्याचे आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. काही दिवसापूर्वी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी आणि आरोग्यमंत्र्यांच्या सचिव यांच्यात वाद झाल्याचे समोर आले होते . यावर आज पहिल्यांदाच आरोग्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी काही कामांना स्थगितीचे आदेश दिले होते. या आदेशाचे खालील अधिकाऱ्यांनी पालन केले आहे का याची मंत्री म्हणून माहिती घेण्याचा मला अधिकार आहे. मी या शासनामध्ये मंत्री असून गोपनीयतेची शपत घेतली आहे मी नेमलेल्या अधिकाऱ्यामार्फत शासनाने अथवा मंत्र्याने मागितलेली माहिती देण्यात जिल्हाधिकाऱ्यांना का वाईट वाटले असा सवाल तानाजी सावंत यांनी केला.
माहिती मागणारा कोणी माहितीच्या अधिकारातील कार्यकर्ता नव्हता मात्र हे जिल्हाधिकाऱ्यांना का मान्य नव्हते असा सवाल करत तुझ्यावर फौजदारी करतो, तुला कार्यालयात बसू देत नाही असे म्हणायचे कारण नव्हते. हे सरकारी कार्यालय आहे. जिल्हाधिकाऱ्यांना यात शंका होती तर त्यांनी माझ्याकडून किंवा मुख्य सचिवांकडून मार्गदर्शन मागवणे अपेक्षित होते असे सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी अताताईपणाने काम केले आणि त्यांची भूमिका मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री अथवा मुख्य सचिव याना नक्कीच आवडलेली नाही. यावर मुख्यमंत्री योग्य ती कारवाई करतील असा विश्वास व्यक्त करीत शासन जे आदेश देते ते मान्य करणे ही त्यांची जबाबदारी असून जी माहिती मागेल ती देणे हे त्यांना क्रमप्राप्त असल्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले. तसेच अशा पद्धतीने काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी राज्यातील सरकार बदलले आहे याची जाणीव ठेऊन त्या मानसिकतेत काम करावे असा इशारा एबीपी माझाशी बोलताना दिला.
आघाडी सरकारमध्ये कोविड काळात झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री माहिती घेत असल्याचे सांगत या साथीच्या काळात झालेल्या खर्चावर अनेक आरोप झाले होते. या खर्चाची कॅगकडून तपासणी होणार नसली तरी हे शासन याबाबत गांभीर्याने चौकशी करेल असे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले. सध्या राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांची येत्या 15 दिवसात अचानक तपासणी करण्याचे काम सुरु असून याचा अहवाल आपल्याकडे येणार आहे. यानंतर राज्याच्या आरोग्य विभागाचा रोड मॅप बनवला जाणार असून यात रुग्णांच्या सुविधांचा जास्तीत जास्त विचार केला जाईल असे सांगितले.
केंद्र सरकारने कोविड सारख्या साथींच्या आजाराशी सामना करण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्याचा निर्णय घेतला आहे . यासाठी केंद्राने जवळपास सव्वा लाख कोटींचे बजेट तयार केले असून महाराष्ट्राला यातील 10 टक्केच्या आसपास रक्कम मिळेल असा विश्वास व्यक्त केला. पुढच्या काळात कोणत्याही साथीच्या आजाराला सामना करण्यासाठी केवळ 24 तास पुरतील अश्या सुविधा आरोग्य विभाग उभारत असल्याचेही सावंत यांनी सांगितले.
सध्या देशात मधुमेहामुळे अनेक नागरिक ट्रस्ट असताना महाराष्ट्रात मधुमेह हटाव मिशन हाती घेणार असल्याचे तानाजी सावंत यांनी सांगितले . सध्या राज्यात औषध पुरवठा करणाऱ्या हाफकिन सारख्या संस्थेची मोनोपली झाली असून त्यांच्याबाबत शासकीय रुग्णालयातून मोठ्या तक्रारी आहेत. भविष्यात आरोग्य विभागात वेगवेगळे कर्मचारी, औषधे, रुग्णवाहिका आणि इतर गरजेच्या पुरवठ्यासाठी एकापेक्षा जास्त एजन्सी नेमण्याबाबत विचार सुरु असल्याचेही सावंत यांनी सांगितले.