KDCC ED Raid : कोल्हापूर जिल्हा बँकेतील कर्मचारी सुनील लाड यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ईडीकडून 30 तास चौकशी सुरू असताना लाड बँकेत कार्यरत होते. दरम्यान, ईडीच्या पथकाने तब्बल 30 तास छप्पेमारी करत बँकेच्या पाच अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर जिल्हा बँकेतील कर्मचारी चांगलेच आक्रमक झाले आहेत. आज सकाळी कर्मचाऱ्यांनी एक तास काम बंद आंदोलन करून निषेध केला होता.
दरम्यान, गुरुवारी सायंकाळी कोल्हापुरात मुख्य बँक शाखेच्या प्रांगणात कर्मचाऱ्यांनी एकत्रित जमताना जोरदार घोषणाबाजी केली होती. ईडीकडून समन्स बजावण्यात आलं असलं, तरी शुक्रवारी हजर करु अशी विनंती कर्मचाऱ्यांनी केली होती. मात्र, ती फेटाळण्यात आल्याने कर्मचारी आक्रमक झाले होते. निषेधाच्या घोषणा कर्मचाऱ्यांनी दिल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते.
30 तासांपासून बँकेमध्ये कारवाई सुरुच असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच अस्वस्थता होती. गुरुवारी सकाळपासून आपापले विभाग सोडायचे नाहीत असे आदेश देण्यात आले होते. चारच्या सुमारास सर्व कर्मचाऱ्यांना बँकेतून खाली पाठवल्याने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह पाच अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्याचे समजताच कर्मचारी आक्रमक झाले होते. 30-30 तास चौकशी केल्याने अधिकारी तणावाखाली आहेत, त्यामुळे त्यांच्या प्रकृतीला काही झाल्यास सर्वस्वी ईडी जबाबदार असेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला होता. 30 तास चौकशी केल्याने कर्मचाऱ्यांच्या डोळ्यावर त्याचे परिणाम स्पष्ट दिसत होते.
पाच अधिकारी ईडीच्या ताब्यात
दरम्यान, गुरुवारी (2 फेब्रुवारी) सुद्धा ईडीची कारवाई सुरु राहिली. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (KDCC ED raid) मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांच्यासह मुख्यालयातील पाच अधिकाऱ्यांना ईडीच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी ताब्यात घेतले. त्यांना पोलीस बंदोबस्तात मुंबईला नेण्यात आलं आहे. ईडीने तब्बल 30 तास ब्रिक्स व संताजी घोरपडे साखर कारखान्याची संबंधित सर्व व्यवहारांची कसून चौकशी केली. गुरुवारी सायंकाळी मुख्य कार्यकारी अधिकारी माने, पत देखरेख विभागाचे व्यवस्थापक आर. जे. पाटील, सहाय्यक व्यवस्थापक अल्ताफ मुजावर, निरीक्षक सचिन डोणकर आणि राजू खाडे यांना समाज बजावून ईडीच्या पथकाने ताब्यात घेतले.
इतर महत्वाच्या बातम्या