कोल्हापूर: पाकिस्तानला चिरडून टाकण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. पण आम्हाला ऑर्डर मिळत नाही. एका दिवसाची सूट द्या, पाकिस्तान काबिज करुन तिरंगा फडकवतो, असं चंदगड तालुक्यातील कारवे गावच्या जवानाने ठणकावून सांगितलं.

कारवे गावचा सुपुत्र राजेंद्र तुपारे हे जम्मू काश्मीरच्या पूँछमध्ये शहीद झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यापूर्वी त्यांच्या गावकऱ्यांशी संवाद साधला असता, गावकऱ्यांनी पाकिस्तानबद्दल एकच चीड व्यक्त केली.

यावेळी कारवे गावातीलच सुट्टीवर आलेल्या जवानाशी 'एबीपी माझा'ने संवाद साधला.

"आम्ही सैन्यदलात आहोत, देशाला करुन दाखवायचं ही ताकद बाळगतो. आदेश देणं हे संरक्षणमंत्री, पंतप्रधान नेत्यांच्या हातात आहे. आम्ही बलिदान देण्यासाठी तयार असतो, आम्हाला आर्डर मिळत नाही, त्यामुळे हे नुकसान होतंय. मी स्वत: पूँछला राहून परिस्थिती बघितली, त्यावेळी आम्हाला जे अधिकार पाहिजे होते, ते मिळत नाहीत, ते सरकारचं दुर्दैव आहे.. आम्हाला सूट द्या, एका दिवसात पाकिस्तानवर तिरंगा फडकवतो. पाकिस्तानवर कब्जा करण्याची क्षमता भारतीय जवानांमध्ये आहे. मात्र आम्हाला ऑर्डर न मिळाल्याने भारतीय सैन्य कमजोर पडत आहे ", अशी प्रतिक्रिया कारवे गावच्या जवानाने व्यक्त केली.

दुसरीकडे गावकरी म्हणाले, "मोदींना सांगू इच्छितो, ठिपक्यासारख्या पाकिस्तानला धडा शिकवा. एकदा आर या पार होऊन जाऊ दे. आम्ही कारवेवासिय देशसेवेसाठी तयार आहोत. चिमुरड्या पाकिस्तानला चिरडून टाका, लष्कराला आदेश द्या"



राजेंद्र तुपारे शहीद

सीमेवरील गोळीबारात महाराष्ट्रातील जवान राजेंद्र तुपारे यांना वीरमरण आलं. राजेंद्र तुपारे हे कोल्हापुरातील चंदगड तालुक्यातील कार्वे गावचे सुपुत्र आहेत. 1983 साली जन्मलेले राजेंद्र तुपारे हे 2002 साली देशसेवेसाठी सैन्यात दाखल झाले. 14 वर्षे त्यांनी भारतमातेची सेवा केली आणि आज शत्रूशी लढताना त्यांना वीरमरण आलं. राजेंद्र तुपारे यांना आर्यन (वय 9 वर्षे) आणि वैभव (वय 5 वर्षे) अशी दोन मुलं आहेत.

शहीद राजेंद्र तुपारेंचं पार्थिव आज कोल्हापुरातील मूळगावी आणणार

कोण होते राजेंद्र तुपारे?

शहीद राजेंद्र तुपारे हे कोल्हापुरातील चंदगड तालुक्यातील कारवे गावचे सुपुत्र आहेत. 1983 साली जन्मलेले राजेंद्र तुपारे हे 2002 साली बेळगाव इथल्या मराठा लाईट इन्फन्ट्रीमध्ये रुजू झाले होते. सध्या ते पुंछमध्ये सीमेवर तैनात होते.

राजेंद्र तुपारे यांनी 14 वर्षे भारतमातेची सेवा केली, मात्र रविवारी शत्रूशी लढताना त्यांना वीरमरण आलं. राजेंद्र तुपारे यांच्या पश्चात पत्नी, दोन आर्यन (वय 9 वर्षे) आणि वैभव (वय 5 वर्षे) अशी दोन मुलं आणि आई-वडील आहेत.

पाकच्या गोळीबारात कोल्हापूरचे सुपुत्र राजेंद्र तुपारेंना वीरमरण

कारवे गावावर शोककळा

शहीद राजेंद्र तुपारे यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या कारवे गावावर शोककळा पसरली आहे. तुपारे कुटुंबाला समाजकार्याची पार्श्वभूमी आहे. कुटुंबाच्या सांत्वनासाठी कालपासूनच कारवेमध्ये रांगा लागल्या आहेत.