पंढरपूर:  कार्तिकी सोहळ्याच्या (Kartiki Ekadashi)  तयारी संदर्भात अजून मंदिर समितीची बैठक होत असून यंदा कार्तिकीची महापूजा नेमकी कोण करणार हा पेच मंदिर समिती समोर कायम आहे . राज्यात सध्या दोन उपमुख्यमंत्री असून यंदा पूजेला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना निमंत्रित करायचे की अजित पवार (Ajit Pawar) यांना हा पेच समितीसमोर आल्यावर त्यांनी थेट याबाबत राज्याच्या विधी व न्याय विभागाकडे यासाठी मार्गदर्शन मागवले होते. शासनाने अद्याप तरी याबाबत कोणताही निर्णय न दिल्याने कार्तिकी महापूजेला नेमके कोणाला निमंत्रण द्यायचे याबाबत या बैठकीत चर्चा होणे अपेक्षित आहे.


पंढरपूर येथील सकल मराठा समाजाने आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत कोणत्याही मंत्री , आमदार , खासदार यांना महापूजेसाठी बोलावू नये असे पत्र मंदिर समितीला दिले आहे.  यंदा सामान्य वारकऱ्याच्या हस्ते शासकीय महापूजा करा मात्र जर उपमुख्यमंत्री अथवा कोणीही मंत्री आल्यास त्याच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा दिल्याने मंदिर समितीसमोरील अडचणी वाढणार आहेत . आधीच कोणत्या उपमुख्यमंत्र्यांनी बोलावयाचे यामुळे अडचणीत सापडलेल्या मंदिर समितीला मराठा आंदोलकांनी दिलेल्या पत्रामुळे नेमके काय निर्णय घ्यायचा हा पेच उभा आहे. 


आजची बैठक वादळी ठरणार


आज दुपारी मंदिर समितीच्या बैठकीत यावर सविस्तर चर्चा होणे अपेक्षित असून यंदाची कार्तिकी महापूजा कोणाच्या हस्ते करायची याबाबत काहीतरी निर्णय अपेक्षित आहे. मंदिर समितीच्या आजच्या बैठकीकडे सकल मराठा समाजाचेही लक्ष असून यामुळे आजची बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे. 


कोणाची नाराजी नको


यंदा कार्तिकी एकादशी 23 नोव्हेंबर रोजी येणार असून याच्या तयारीसाठी काल मंदिर समितीची बैठक झाली . सध्या राज्याच्या राजकारणात रोज नवीन घडामोडी घडत असून सध्या राज्याला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोन उपमुख्यमंत्री आहेत . कार्तिकीच्या पूजेला एकाच उपमुख्यमंत्र्यांनी बोलवावे लागणार असून गेल्या कार्तिकी यात्रेची पूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाली होती. यावर्षी दोन उपमुख्यमंत्री असल्याने नेमके हा मान कोणाला द्यायचा या पेचात मंदिर समिती सापडली असून एकाला बोलावल्यास दुसऱ्याची नाराजी समितीला परवडणारी नाही . या मंदिर समितीची मुदत संपून जवळपास अडीच वर्षे झाली असली तरी अजून नवीन समितीबाबत कोणत्याही हालचाली नसल्याने कोणाची नाराजी नको अशीच सध्याच्या समितीची भूमिका आहे.


हे ही वाचा :


Kartiki Ekadashi 2023: जिल्हाधिकाऱ्यांनी केली कार्तिकी यात्रा तयारीची पाहणी, कार्तिकी एकादशीला 15 लाख भाविक दर्शनासाठी येण्याचा अंदाज