पंढरपूर: एका बाजूला मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलकांनी पंढरपूरमध्ये आमदार खासदारांना एन्ट्री न देण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही परिस्थितीत उपमुख्यमंत्री पूजेस आले तर काळे फसू असा इशारा दिला असताना जिल्हाधिकाऱ्यांनी कार्तिकी यात्रेच्या तयारीची पाहणी केली. यंदा कार्तिकी यात्रेसाठी (Kartiki Ekadashi) 10 ते 12 लाख भाविक येण्याचा अंदाज असताना राज्यात सुरु असलेले मराठा आंदोलन आणि त्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या भाविकांना द्याव्या लागणाऱ्या सुविधा याची पाहणी केली. दरवर्षी कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत असते. मात्र यंदा मराठा आरक्षण न मिळाल्यास उपमुख्यमंत्र्यांनी काळे फसू असा इशारा देत आंदोलकांनी वारकऱ्याच्या हस्ते ही पूजा करण्याचे पत्र मंदिर समितीला दिले आहे. त्यामुळे आता यात्रेला 10 ते 12  लाख भाविक येणार असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सज्ज आहे . 


कार्तिकी एकादशी ही 23 नोव्हेंबर रोजी होणार असून यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग , दर्शन रांग , चंद्रभागा वाळवंट , भाविकांच्या निवासाचा 65 एकर भक्ती सागर याची पाहणी केली . यावेळी त्यांनी दर्शन रांगेत कोणत्याही प्रकारची घुसखोरी होणार नाही वयाची सूचना प्रशासनाला दिल्या .ज्या ठिकाणी दर्शन रांगेजवळ मठ असल्याने तेथून वारकरी जी घुसखोरी करतात त्यासाठी तेथे पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्याच्या सूचना दिल्या. याशिवाय दर्शन रांगेत दोन खांबामधील अंतर जास्त असल्याने येथेही हजारो भाविक घुसखोरी करीत असल्याने हे अंतर कमी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले .
 
यात्रा कालावधीमध्ये चंद्रभागेच्या पात्रात पाणी ठेवण्यासाठी उजनी धरणातून 1 टीएमसी पाणी सोडावे लागेल असे सांगताना सध्या उजनीत फक्त 58 ते 60 टक्के पाणी असल्याने याबाबत चर्चा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या धरणात असलेले पाणी 30 जूनपर्यंत पुरवून वापरावे लागणार असल्याने यात्रेसाठी कोणत्या पद्धतीने पाणी देता येईल याबाबत जलसंपदा विभागाशी चर्चा करून येत्या दोन दिवसात निर्णय होईल असे त्यांनी सांगितले. कार्तिकी यात्रेत देशभरातील लाखो भाविक येत असताना यासाठी जिल्हाधिकारी चार दिवस पंढरपूर मध्ये मुक्कामी थांबणार आहेत. मराठा आरक्षणाबाबत तोडगा यात्रेपूर्वी निघाल्यास निर्व्हिंगणपणे यात्रा पार पडणार आहे . मात्र यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना कोणताही त्रास न होता सुलभपणे आणि जालंदरीतीने दर्शन देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या आहेत . यावेळी पंढरपूर प्रांताधिकारी गजानन गुरव , मंदिर समिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके , उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले ,  मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव व इतर अधिकारी उपस्थित होते . 


हे ही वाचा :


अजितदादा आणि फडणवीसांना कार्तिकी एकादशीला 'नो एन्ट्री', 'आरक्षण न देता येण्याचा प्रयत्न केल्यास काळे फासू' सकल मराठा समाजाचा इशारा