पंढरपूर : मठाधिपतीच्या वादातून पंढरपुरातील प्रसिद्ध कराडकर मठामध्ये विद्यमान मठाधिपतीची माजी मठाधिपतीकडून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. हत्येच्या धक्कादायक घटनेमुळे वारकरी संप्रदाय हादरून गेला आहे.

मंगळवारी ( 7 जानेवारी) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास विद्यमान मठाधिपती जयवंत पिसाळ ( वय 30 , लवंगमाची ता. वाळवा, जि सांगली ) यांची माजी मठाधिपती बाजीरावबुवा कराडकर ( वय 35 , कोडोली , ता कराड ) यांच्याशी वाद झाले आणि या वादातून कराडकर यांनी चाकू व वरवंट्याच्या साहाय्याने पिसाळ यांची निघृण हत्या केली.

कराडकर हा जेष्ठ वारकरी नेते बंडातात्या कराडकर यांचा मठ असून या माठातील बाजीराव कराडकर याना संस्थेच्या विश्वस्तांनी वर्षभरापूर्वी मठाधिपती पदावरून हटवून जयवंत पिसाळ यांची नेमणूक केली होती. यानंतर गेल्या वर्षभरापासून अनेक वाद आरोपी आणि ट्रस्टी यांच्यात सुरु होते. यातील आरोपी असलेले बाजीरावबुवा यांनी काही महिन्यापूर्वी एका ट्रस्टीला बेदम मारहाण केल्याच्या कारणावरून त्यांना सातारा जिल्ह्यात शिक्षाही झाल्याची माहिती आता समोर येऊ लागली आहे.

कालच पुत्रदा एकादशी झाल्याने ही सर्व वारकरी मंडळी मठात आली होती . या काळातील दशमी , एकादशी आणि द्वादशी असे तीन दिवसाची कीर्तन सेवा असते . यातील एक कीर्तन देण्याची मागणी आरोपीने केली होती असे सांगितले जात आहे . यावरूनच दोघात वाद झाले यानंतर मठाधिपती जयवंत पिसाळ आपल्या खोलीत गेल्यावर आरोपी बाजीरावबुवा यांनी आपल्या खोलीत जाऊन चाकू व वरवंटा आणून थेट जयवंत पिसाळ यांच्या खोलीत जाऊन त्यांच्यावर हल्ला केला . यावेळी बाजीरावबुवाने मठाधिपती जयवंत यांचे डोळ्यावर , गेल्यावर व शरीरावर अनेक ठिकाणी सपासप वार करून त्यांचा खून केला .

हत्येची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी माहिती देणाऱ्यास या खोलीचा दरवाजाला बाहेरून काडी घालण्यास सांगितल्याने आरोपी हत्यारासह पोलिसांच्या हाती मिळाला . गेल्या आषाढी यात्रेत चांगली पर्यावरण पूरक दिंडी साठी खून झालेले जयवंत पिसाळ यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला होता . जगाला शांतता आणि समतेचा संदेश देणाऱ्या वारकरी संप्रदायात एकंदर मठाधिपती पदावरून झालेली निर्घृण हत्या संप्रदायाची धक्कादायक असून आता पोलीस चौकशीत सर्व बाबी समोर येणार आहेत . दरम्यान या हत्येची माहिती मिळताच पंढरपुरात असलेले वारकरी संप्रदायाचे महाराज मंडळींनी तातडीने कराडकर मठात धाव घेतली आहे .