मुंबई : यावर्षी एप्रिल महिन्याने उष्णतेच्या बाबतीत नव्या विक्रमाची नोंद केली आहे. 2017 मधला एप्रिल हा महिना 137 वर्षांच्या इतिहासातला दुसरा सर्वात उष्ण एप्रिल महिना ठरला आहे.
अमेरिकेतील अवकाश संशोधन संस्था 'नासा'नं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या महिन्याचं तापमान सरासरी वर्षांमधल्या तापमानापेक्षा 0.88 अंश सेल्सिअसनं जास्त होतं.
गेल्या 137 वर्षांतील एप्रिल महिन्यातील तापमानाचा इतिहास पाहता, गेल्या दोन वर्षांत एप्रिल महिना सर्वाधिक उष्ण ठरत आहे. या कालावधीत एप्रिल 2016 हा सर्वाधिक उष्ण एप्रिल महिना ठरला होता.
एप्रिल 2016 चं तापमान हे 1951 ते 1980 या दीर्घकालीन सरासरीपेक्षा 1.06 अंश सेल्सिअस जास्त होतं. तर 2017 मधील एप्रिल महिन्याचे सरासरी तापमान हे एप्रिल महिन्याच्या दीर्घकालीन सरासरी तापमानाच्या तुलनेत 0.88 अंश सेल्सिअसने जास्त होतं.
थोडक्यात, एप्रिल 2016 च्या तुलनेत एप्रिल 2017 हा महिना 0.18 अंश सेल्सिअसने शीतल होता. 2010 मधील एप्रिल हा या कालावधीतील तिसऱ्या स्थानावरील सर्वात उष्ण एप्रिल महिना ठरला.
नासाच्या गोडार्ड इन्स्टिट्युट फॉर स्पेस स्टडीजतर्फे तापमानाचं दर महिन्याला विश्लेषण केलं जातं. त्यासाठी जगाच्या विविध भागांतील सुमारे 6 हजार 300 हवामान केंद्रं समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानाची नोंदी घेतात.