कल्याण : टोईंगवाल्यांच्या मनमानीमुळे कल्याणमध्ये एकाचा बळी गेला आहे. वाहतूक विभागाने जप्त केलेली बाईक सोडवण्यासाठी धावताना एका व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. मधुकर शंकर कासारे असं मृत्यू व्यक्तीचं नाव असून ते निवृत्त बँक अधिकारी होते.
कल्याण पश्चिमेच्या महालक्ष्मी हॉटेल परिसरात बुधवारी संध्याकाळी टोईंग करणारे कर्मचारी अस्ताव्यस्त लावलेल्या दुचाकी जप्त करत होते. तिथेच रस्त्याच्या कडेला मधुकर कासारे यांनी बाईक लावली होती. मात्र त्यांची बाईकही वाहतूक विभागाचे कर्मचारी टोईंग व्हॅनने उचलू लागले. हे पाहताच मधुकर यांनी टोईंगवाल्यांना बाईक जप्त न करण्याची विनंती केली. मात्र, 'वाहतूक विभागाच्या शाखेत येऊन पैसे भरा आणि बाईक घेऊन जा’, असं उत्तर टोईंगवाल्यांनी मधुकर यांना दिलं.
त्यानंतर त्यांनी टोईंग व्हॅनचा पाठलाग केला. पण धावताना त्यांना चक्कर आली आणि ते खाली कोसळले. उपचारासाठी त्यांना कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. हृदयविकाराच्या झटक्याने मधुकर कासारे यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. महात्मा फुले पोलीस स्टेशनला आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.