गोंदियाः जिल्ह्यातील अर्जुनी मोरगावच्या कुसुमतोंडी गावातील फुलचंद भगत महाविद्यालयात चांगलाच सन्नाटा पसरला आहे. विद्यार्थी तर पुरते निराश झाले आहेत. कारण बारावीच्या परीक्षेत वर्गातील सर्वच्या सर्व 61 विद्यार्थी केमिस्ट्रीच्या पेपरमध्ये नापास झाले आहेत.

 

सर्व विद्यार्थी नापास होण्याचं कारणही तसंच आहे. सर्व विद्यार्थ्यांनी पेपर लिहिताना मास कॉपीचा आश्रय घेतला. जे विद्यार्थ्यांच्या चांगलंच अंगाशी आलं. बोर्डाने सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना नापास केलं आहे.

 

दोन महाविद्यालयात सारखाच प्रकार

पेपर लिहिताना विद्यार्थ्यांनी मास कॉपी केली. म्हणजे सर्व विद्यार्थ्यांचे पेपर, उत्तरं लिहिण्याची पद्धत आणि क्रमही जसाच तसा होता. पेपर तपासतांना परीक्षकाला कॉपी केल्याचा संशय आला. त्यामुळे नागपूर बोर्डाने मुलांना बोलावून त्यांची तोंडी परीक्षा घेतली  आणि मास कॉपीचा ठपका ठेवत सगळ्या मुलांना केमिस्ट्रीत भोपळा देऊन टाकला.

 

दुसरीकडे डबकी गावच्या सिद्धार्थ महाविद्यालयातही असाच प्रकार घडला. या महाविद्यालयात 124 विद्यार्थी बारावीत होते. केमिस्ट्रीच्या पेपरमधील सगळ्यांची उत्तरं सेम टू सेम होती. बोर्डानं मुलांना नागपूरला बोलावलं आणि तोंडी परीक्षेनंतर ठरल्याप्रमाणं केमिस्ट्रीत भोपळा देण्यात आला.

 

बोर्डाने घेतली तोंडी परीक्षा

दोन्ही महाविद्यालयातील मिळून 185 विद्यार्थ्यांची नागपूर बोर्डानं तोंडी परीक्षा घेतली. यातील फक्त एकच विद्यार्थी पास होऊ शकला. कारण एकाच मुलानं कुठलाही प्रश्न विचारा, मी त्याचं उत्तर देतो, असं आत्मविश्वासानं सांगितलं. पण केमिस्ट्रीचे फॉर्म्युले सांगताना बाकीच्या मुलांना नाकीनऊ आले.

 

बिहारमधील लल्लन टॉपर्स सध्या देशभर गाजत आहेत. मास कॉपीमुळे संपूर्ण कॉलेज बदनाम झालं आहे. शिक्षण पद्धती चांगलीच संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. त्यामुळं निकाल वाढवण्यासाठी फुलचंद कॉलेज आणि सिद्धार्थ विद्यालयातही बिहारमधील फॉर्म्युला वापरला जात आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.