मुंबई : अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असला तरी कल्याण डोंबिवली शहरातील  रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम मात्र अत्यंत संथ गतीने सुरू आहेत. आज महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी रस्त्याच्या कामांची पाहणी केली. पालिका आयुक्तांनी  कामांबाबत नाराजी व्यक्त करत तीन दिवसात खड्डे बुजवा, एका रस्त्यासाठी तीन पथके तयार  करा, लवकरात लवकर खड्डे बुजवा अन्यथा तुम्हाला ब्लॅकलिस्ट करू. ब्लॅकलिस्ट केले तर पुन्हा कल्याण डोंबिवलीत काम मिळणार नाही असा इशाराच ठेकेदारांना दिला आहे. 


यंदाच्या पावसाळ्यात कल्याण डोंबिवली शहरातील अंतर्गत रस्त्यांचे अक्षरशः दुरवस्था झाली आहे. शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी देखील आदेश दिले आहेत. तर आयुक्तांनी थेट रस्त्यांची पाहणी करत  ब्लॅकलिस्ट करण्याचा ठेकेदारांना इशारा दिलाय. कामे दर्जेदार व्हावीत , ठेकेदारावर नियंत्रण राहण्यासाठी अधिकाऱ्यांना देखील 24 तास फिल्ड राहण्याची आयुक्तांनी ताकीद दिली. येत्या 31 ऑगस्टला गणरायाचे आगमन होणार आहे. त्यामुळे हाती असलेल्या तीन दिवसात रस्त्यावरील खड्डे भरत रस्ते सुस्थितीत होतील का? की गणरायाला देखील खड्ड्याचा सामना करावा लागणार   हे पाहावं लागणार आहे .


महापालिका आयुक्तांनी आज दरवस्था झालेल्या रस्त्यांची पाहणी केली. त्यानंतर रस्त्यांची कामं तातडीने करण्याच्या सूचना दिल्या. शहरातील रस्त्यांवर खड्डे भरण्याचे कामे सुरू असली तरी प्रत्यक्षात ती अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचं दिसून येतय.


गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. मात्र कामाचा वेग पाहता यंदा गणरायाचे आगमन खड्ड्यातूनच होईल की काय असे चित्र दिसून येतंय. या पार्श्वभूमीवर आज पालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी पुन्हा काम सुरू असलेल्या रस्त्यांची पाहणी केली. 


कल्याण पश्चिमेकडील दुर्गाडी चौक येथील रस्त्याचे पाहणी करताना पालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी नाराजी व्यक्त केली. आयुक्त दांगडे यांनी अधिकारी व ठेकेदारांना कडक सूचना दिल्यात. रस्त्यांची कामे सुरू होती, मात्र पावसामुळे डांबरीकरण करता येत नव्हतं, आता पावसाने उघडीप घेतलीय. त्यामुळे कामे युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहेत. खड्डे बुजवण्याच्या कामासाठी 13 एजंसी नेमल्या असून प्रत्येक एजंसीला  तीन पथके तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 


आयुक्तांच्या सूचनांनतर आता 24 तास काम सुरू रहाणार आहे. ठेकेदारांना आणि सबंधित अधिकाऱ्यांना दर्जेदार काम करावे आणि अधिकाऱ्यांनी ऑन फील्ड राहण्याच्या यावेळी आयुक्तांनी सूचना दिल्या आहेत.  कुणी ठेकेदार कमी पडत असेल तर त्यांना ब्लॅकलिस्ट केलं जाईल, पुन्हा कल्याण डोंबिवलीत काम करण्याची संधी दिली जाणार नाही, अशी तंबी देखील पालिका आयुक्तांनी दिली.