सातारा : सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील प्रचलित असलेल्या मांढरदेवी गडावरील काळुबाईची यात्रा यंदा रद्द करण्यात आली असून 13 जानेवारी ते 13 फेबुवारी पर्यंत मंदिरही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या पाश्वभुमीवर प्रशासकिय यंत्रणेकडून काळजी घेतली जात असताना आज सातारा जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
यात्रेदरम्यान देवस्थानचे ट्रस्टी, मंदिर पुजारी व ग्रामस्थ अशा मोजक्याच भाविकांनी मंदिराचे पुजन करण्याच्या या बैठकित प्रशाकिय यंत्रणेकडून सुचना देण्यात आल्या आहेत. साता-यातील मांढरदेव गडावरील काळुबाई देवीची यात्रा मोठी प्रचलित आहे. या यात्रेला महाराष्ट्रासह इतर राज्यातील लाखो भाविक गडावर देवीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. गेल्या वर्षीच्या आकडेवारीनुसार गडावर सुमारे 8 लाख भाविकांनी हजेरी लावली होती.
जानेवारी महिन्यात पौष पौर्णिमेला या देवीची यात्रा भरते. 27,28 आणि 29 जानेवारीला या देवीची मुख्य यात्रा गडावर भरते. मात्र किमान एक महिनातरी या गडावर देवीच्या भक्तांची मोठी रेलचेल असते. म्हणूनच करोनाच्या पाश्वभुमीवर यात्रा, जत्रांसह गर्दी होणारे सार्वजनिक उत्सव रद्द करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असला तरी तो पूर्णपणे थांबलेला नाही. त्यात कोरोनाच्या नविन संक्रमनाचाही धोका या यात्रेवर दिसू शकतो. याच कारणातून गडावर झालेल्या बैठकीत प्रशासनाने हा निर्णय घेतला. या बैठकीत गावातील काही ग्रामस्थ, मंदिर, समितीचे ट्रस्टी, दुकानदार, स्टॉल धारक, पुजारी आणि देवस्थानचे विश्वस्त उपस्थित होते.
यात्रेदरम्यान या गडाच्या पंचक्रोशीतील लोकांचे पै पाहुणेही मोठ्या प्रमाणात मुक्कामी येत असतात. त्यांच्यावरी बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे मांढरदेवी गडावरची ही यात्राही रद्द करण्यात आलीच शिवाय देवीचे मंदिरही तब्बल एक महिना बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे. एका बाजूला समाधानाचे वातावरण असले तरी दुसरीकडे मात्र अनेक भाविक मात्र नाराज झाले आहेत.