अकोला : 'एबीपी माझा'ने सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे अकोल्यातील शेतकऱ्यांना अखेर न्याय मिळाला आहे. बाळापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांची जमीन राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी अगदी कवडीमोल दराने अधिग्रहित करण्यात आली होती. तब्बल तीन वर्ष शेतकऱ्यांच्या संघर्षात 'माझा'ने साथ दिली. अखेर नमलेल्या सरकारने अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना प्रती गुंठा दीड ते अडीच लाख रुपयांपर्यंत वाढीव मोबदला दिला आहे.


सुरत-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणासाठी बाळापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची महामार्गालगतची जमीन अधिग्रहित करण्यात आली होती. मात्र, या शेतकऱ्यांना प्रती गुंठा दोन ते चार हजार रुपयांचा मोबदला देत सरकारने पानं पुसली होती.

वाढीव मोबदल्याच्या न्यायासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांचा सरकारशी संघर्ष सुरु होता. यातील हतबल झालेल्या सहा शेतकऱ्यांनी 5 ऑगस्ट 2019 रोजी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. हा मुद्दा राज्यभर गाजला होता. या शेतकऱ्यांच्या प्रत्येक संघर्षात 'एबीपी माझा' ताकदीने सोबत होता. अखेर या शेतकऱ्यांना सरकारने प्रती गुंठा दीड ते अडीच लाखांचा वाढीव मोबदला दिला आहे. या शेतकऱ्यांनी या लढ्यात साथ दिल्याबद्दल 'माझा'चे कृतज्ञतापूर्वक आभार मानले आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकमेकांचं तोंड गोड करुन आनंद व्यक्त केला.


बाळापूर ते अकोल्यादरम्यान या महामार्ग विस्तारीकरण कामात बाळापूर तालुक्यातील बाभुळखेड, व्याळा, रिधोरा, सातरगांव, कास्तखेड, कासारखेड, मांडोली, भिकुंडखेड, शेळद, कान्हेरी या गावांतील जमीन गेली आहे. पहिल्या टप्प्यात यातील 150 शेतकऱ्यांपैकी 50 जणांना मोबदला देण्यात आला आहे. लवकरच उर्वरित शेतकऱ्यांनाही वाढीव मोबदल्याचे पैसे लवकरच दिले जाणार आहेत.


'एबीपी माझा'च्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य माणूस अन् शेतकरी राहिला आहे. बाळापूरच्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याच्या लढ्यात आम्ही याच वारशाच्या बळावर शेतकऱ्यांना न्यायापर्यंत पोहोचवलं. त्यामुळे अशा प्रत्येक लढाईत आम्ही सर्वसामान्यांची ढाल बनत अखेरपर्यंत लढत राहू.