मुंबई : गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे बंदीला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील निकाल शुक्रवारी देण्याचं मुंबई उच्च न्यायालयानं ठरवलं आहे. सकाळी 11 वाजता न्यायमूर्ती शंतनू केमकर आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांचं खंडपीठ हा निकाल जाहीर करेल. त्यानंतर विसर्जन मिरवणुकीत डीजे आणि डॉल्बीबाबत हायकोर्टाकडून दिलासा मिळणार की नाही? हे स्पष्ट होईल.

मात्र ध्वनी प्रदुषणाची पातळी ओलांडणाऱ्या डीजेला सार्वजनिक ठिकाणी परवानगी देणं शक्य नाही. कारण डीजेची किमान पातळी हीच ध्वनी प्रदूषणाच्या कमाल मर्यादेच्या बाहेर आहे, असा दावा करत राज्य सरकारानं डीजे आणि डॉल्बी सिस्टिमला हायकोर्टात जोरदार विरोध केला. काहीवेळेला एखाद्या गोष्टीवर बंदी घालणं हे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचाच एक भाग असतं असं राज्य सरकारनं म्हटलं आहे.

डीजे सिस्टिम केवळ सुरु करताच ध्वनी मर्यादेची पातळी ओलांडतात, त्यामुळे परवानगीचा प्रश्नच उद्भवत नाही. विसर्जन मिरवणुकीसारख्या सोहळ्यात पोलीस केवळ कारवाई करु शकतात, त्यांना रोखू शकत नाहीत. असं सांगत राज्य सरकारनं गेल्यावर्षभरात ध्वनी प्रदुषणासंदर्भात दाखल झालेल्या खटल्यांत 75 टक्के प्रकरण डीजेची आहेत अशी माहिती राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी बुधवारी हायकोर्टात दिली होती.

ध्वनी प्रदूषणाच्या मर्यादेत राहून डीजे आणि डॉल्बी सिस्टिमचा वापर करणाऱ्यांवर बंदी का? असा सवाल करत प्रोफेशनल ऑडियो आणि लायटिंग असोसिएशन (पाला) या संघटनेनं अॅड. सतीश तळेकर यांच्यामार्फत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

मुळात यासंदर्भात कायदा अस्तित्त्वात असतानाही त्याची योग्यपद्धतीनं अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे. तसेच पोलीस हे आयोजकांना सोडून साऊंड सिस्टिम भाड्यानं देणाऱ्यांवर कारवाई करत असल्याचं या याचिकेतून सांगण्यात आलं.

लाखो रुपयांची इलेक्ट्रॉनिक उपकरणं विकत घेऊन या व्यवसायात उतरलेल्यांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याची खंतही या याचिकेतून व्यक्त करण्यात आली आहे. गणेशोत्वाची सुरूवात झाली की विसर्जन मिरवणुकांत डीजेंच्या वापराचा मुद्दा उपस्थित होतो. खबरदारीचा उपाय म्हणून राज्यभरात अनेक ठिकाणी पोलिसांनी नोटीसा पाठवून साऊंड सिस्टिमची गोदामं गणेशोत्सवापर्यंत सील केली आहेत. ऐन सणासुदीच्या दिवसांत पोलिसांकडून अशाप्रकारे व्यवसायावर गंडांतर येत असतील, तर या व्यवसायात आलेल्या तरुणांनी करायचं काय? असा सवाल या याचिकेतून करण्यात आला आहे.