पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज बारामती दौऱ्यावर आहेत. बारामती तालुक्यातील भागात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या परिस्थितीचा सध्या ते आढावा घेत आहेत. जळगाव सुपे येथे ग्रामस्थांशी चर्चा करत असताना विविध वृत्तवाहिन्यांचे पत्रकार चित्रीकरण करत असताना अजित पवार यांनी चित्रीकरण करण्यास मज्जाव केला. आता तुम्हीच शुटींग करा, मी दौरा बंद करतो, असं म्हणत पत्रकारांवरच नाराजी व्यक्त केली.
देऊळगाव रसाळ या ठिकाणी पाहणी दौऱ्यासाठी जाताना वाटेत नागरिकांशी संवाद साधत होते त्यावेळी चित्रीकरण करणाऱ्या माध्यम प्रतिनिधीना 'यांनी तर नको केलं आहे' असं अजित पवार म्हणाले. त्यानंतर बारामती तालुक्यातील काऱ्हाटी येथे प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता 'मी प्रतिक्रिया देणार नाहीत', असे अजित पवार म्हणाले. खरंतर अजित पवारांनी बांधावर जाऊन पाहणी न करता गावातील मंदिरात जाऊन लोकांशी संवाद साधणे पसंत केलं आहे.
जळगाव सुपे, देऊळगाव रसाळ, काऱ्हाटी या गावांसह आठ गावांची आज अजित पवारांनी पाहणी केली. त्यांनी काऱ्हाटी, जळगाव सुपे आणि देऊळगाव रसाळ या गावांमध्ये मंदिरात बैठका घेतल्या. अजित पवारांनी बांधावर जाऊन पिकाची पाहणी केल्याचा दावा काऱ्हाटी येथील गावकऱ्यांनी केला आहे. मात्र आजित पवारांनी बांधावर जाऊन पाहणी केली नाही, असं समोर आलं आहे.
दुसरीकडे उद्धव ठाकरे हे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावात बांधावर गेले होते. ज्यावेळी अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर असतात. त्यावेळी बहुसंख्यवेळा अजित पवार माध्यम प्रतिनिधींना चित्रीकरण करण्यास मज्जाव करतात. त्यांचं बैठका घेण्याचं ठिकाण हे विद्याप्रतिष्ठान असतं. जनता दरबार याच ठिकाणी भरतो. मात्र बहुसंख्यवेळा अजित पवार हे माध्यम प्रतिनिधींना हे माझं खासगी ठिकाण आहे, असं म्हणून चित्रिकरण करण्यास मज्जाव करतात.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे भल्या पहाटे काम करत असतात याचं कौतुक राज्यभर केलं जातं. परंतु अनेकदा ज्यावेळी अजित पवार बारामती शहरातील विकास कामांची पाहणी करत असतात त्यावेळी माध्यम प्रतिनिधींना पाहणी करत असतानाचे काही सेकंदाचे व्हिडीओ हवे असतात. त्यावेळी देखील अजित पवार हे माध्यमांवर मज्जाव करत असल्याचं आतापर्यंत अनेकदा समोर आलं आहे. अर्थात काही माध्यम प्रतिनिधी अतिरेक करत व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न करतात त्यांची अडवणूक केली तर योग्य आहे. मात्र आज टंचाईग्रस्त भागाची पाहणी केली आणि त्याचं चित्रिकरण केलं तर बिघडलं काय? आणि सार्वजनिक ठिकाणाची पाहणी करत असल्यास माध्यम प्रतिनिधींनी व्हिडीओ काढले तर त्यात चुकीचं काय?, असे प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहे.
इतर महत्वाची बातमी-