Jitendra Awhad : गानसम्राज्ञी लतादीदी मंगेशकर यांच्या नावाने पहिला 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' (Lata Mangeshkar Award)सोहळ्याचा कार्यक्रम षण्मुखानंद सभागृहात पार पडला. या पहिल्याच पुरस्कार सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हा देशसेवा आणि समाज कार्यासाठी दिला जाणारा पुरस्कार आहे. देशाप्रती असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांचे काम आणि सेवा बघून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पण या पुरस्कार सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाचा कुठेही उल्लेख नाही. यावर राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच मंगेशकर कुटुंबियावर टीकास्त्र सोडलं आहे. 






लता मंगेशकर पुरस्कार सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्र्यांचे नाव टाकण्याचं मंगेशकर कुटुंबियांनी टाळले. त्यांची ही भूमिका अगम्य आहे. या राज्यात राहून अमाप लोकप्रियता मिळवणाऱ्या मंगेशकर कुटुंबीयांची ही कृती 12 कोटी मराठी माणसांचा अपमान करणारी आहे, असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी पुरस्कार स्वीकरण्यासाठी मुंबईत आले. त्यावेळी त्यांची आणि उद्धव ठाकरे यांची भेट होईल, असा कयास लावला जात होता. पण निमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्र्याचं नाव नव्हते. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कार्यक्रमाला जाणे टाळले, असा बोललं जात आहे. दरम्यान, या कार्यक्रमाला शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी उपस्थिती दर्शवली होती.  तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विमानतळावर आगमन झाल्यानंतर मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्वागत केले होते.


ज्येष्ठ गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर आणि आदिनाथ मंगेशकर यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या कार्यक्रमात मंगेशकर कुटुंबीयांसोबत राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस,  विनोद तावडे उपस्थित होते. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत दाखल तेव्हा देवेंद्र फडणवीस, आदित्य ठाकरे, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले.


हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, गीत ही एक साधना असून ही एक भावना ही आहे. जे अव्यक्तला व्यक्त करू शकते. संगीत व्यतीत ऊर्जा आणि चेतना निर्माण करते. लतादीदी वयानं आणि कर्मानंही मोठ्या होत्या. लतादीदी सरलतेची प्रतिमूर्ती, सरस्वतीदेवीचं प्रतिरुप होत्या, असं ते म्हणाले आहेत. पंतप्रधान मोदी म्हणाले की, संगीत तुमच्यात शौर्य भरते. संगीत मातृत्व आणि प्रेमाची भावना देऊ शकते. संगीत तुम्हाला देशभक्ती आणि कर्तव्याच्या शिखरावर नेऊ शकते. आपण सर्व भाग्यवान आहोत की संगीताची ही ताकद लता दीदींच्या रूपात आपल्याला पाहायला मिळाली.