ठाणे : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि खासदार श्रीकांत यांच्यात निधी मिळवण्याच्या विषयावरून शाब्दिक जुगलबंदी आज ठाण्याच बघायला मिळाली. आणि त्यामुळे उपस्थित नागरिकांची चांगलीच करमणूक झाली. आपल्या मतदारसंघासाठी 25 कोटींचा निधी मिळावा म्हणून जितेंद्र आव्हाड यांनी खेळीमेळीत का होईना पण श्रीकांत शिंदे यांच्या समोर स्टेजवरच हात देखील जोडले.
ठाण्यातील नगरसेवक उमेश पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खारेगाव परिसरात महानगरपालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या वीस दशलक्ष लिटर पाण्याच्या टाकीचे लोकार्पण आज राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या लोकार्पण सोहळ्याला स्थानिक खासदार श्रीकांत शिंदे महापौर नरेश म्हस्के आणि इतर राजकीय नेते उपस्थित होते. लोकार्पणाच्या वेळी या दोघांच्या जुगलबंदीची एक व्हिडीओ क्लिपच एबीपी माझाच्या हाती लागली आहे. सुरुवातीला जितेंद्र आव्हाड यांनी "निधी मागायचा असेल तर सरकारकडे जाण्यात अर्थ नाही, महानगरपालिकेकडे जाण्यात अर्थ नाही, यांच्याकडे ( श्रीकांत शिंदे ) जा, पोरासाठी बाप ( एकनाथ शिंदे ) कधीही तयार असतो, मी खूप प्रयत्न करून देखील पाण्याला निधी मिळत नव्हता, तो यांनी एका मिनिटात आणला, त्यासाठी त्यांचे लाख लाख आभार, आम्हाला काय, निधी मिळल्याशी मतलब", असे म्हणत एकाच वेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना टोला लगावला.
तर त्याला ताबडतोब खासदारांनी प्रत्युत्तर दिले. "आव्हाड साहेबांचं मोठेपण आहे, त्यांच्याकडे गृह निर्माण विभाग आहे, मोठी मोठी कामं ते करतात, पण सर्व निधी शेवटी नगरविकास विभागाकडे येऊन थांबतो, मुंब्र्यात तुम्ही खूप मोठी काम केली आहेत, यापुढे देखील जेव्हा जेव्हा तुम्हाला निधी लागेल, तेव्हा तेव्हा नगर विकास विभाग तो देईल", असे शिंदे म्हणाले. त्यावर पुन्हा आव्हाड यांनी "गेली दोन वर्ष झाले 25 कोटी रुपये निधी मागतोय, आज देतो उद्या देतो असं सुरुये, ( श्रीकांत शिंदे यांना हात जोडत ) निधी मंजूर करून घ्यावा", असे मस्करीत म्हटले. यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
Thane | MP श्रीकांत शिंदेंसमोर MLA जितेंद्र आव्हाडांनी जोडले हात - Jitendra Awhad vs Shrikant Shinde