मुंबई: तपास यंत्रणांचा वापर करुन राज्यातील महाविकास आघाडीचे अस्थिर करण्याचा जो काही प्रयत्न सुरू आहे त्यावरआता वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल. पण माझं मत विचाराल तर मी माझ्या पोरीला महाराष्ट्रात ठेवणार नाही असं वक्तव्य राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेव्हण्यावर ईडीने आज कारवाई केली. त्यावर प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, "राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे, यावर आता वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल. पण माझं मत विचाराल तर माझ्या मुलीला मी महाराष्ट्रात ठेवणार नाही."


मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हे वक्तव्य केल्यानंतर अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. पण त्यांनी हे वक्तव्य का केलं हे मात्र स्पष्ट झालं नाही. 


जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, "राज्याने कुणावर कधी अशी सूडबुद्धीन कारवाई केली नाही, कुणाला जेलमध्ये टाकलंय असं झालं नाही. चौकशी सुरू असणं आणि घरात धाडी टाकणं यात फरक आहे."


महाविकास आघाडी भक्कम
मंत्री जितेंद्र आव्हाड भाजपवर टीका करताना म्हणाले, "विरोधकांनी सरकार अस्थिर करावं, पण ते अशा माध्यमातून करावं हे चुकीचं आहे. हे म्हणजे लोकशाहीचा मुडदा पाडण्याचं राजकारण आहे. अशा प्रकारे तपास यंत्रणेचा गैरवापर करुन जर राज्यातील सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरु असतील तर ते महाराष्ट्रातील जनता पाहत आहे. तुम्ही आम्हाला जेवढं डिवचाल तेवढं आम्ही जास्त जवळ येऊ, तुम्ही डिवचाल म्हणून आम्ही कोसळू असं होणार नाही."


ईडीने आज मुख्यमंत्र्यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्यावर कारवाई केली. त्यासंबंधी ईडीने एक प्रसिद्धीपत्रक काढून या कारवाईची माहिती दिलीय. 6 मार्च 2017 मध्ये नोंदवलेल्या मनी लाँडरिंग प्रकरणी ही कारवाई असल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय. 2017 मध्ये मेसर्स पुष्पक बुलियन्स या पुष्पक ग्रुपच्या एका कंपनीविरोधात ही कारवाई होती. मात्र आज झालेली जप्तीची कारवाई ही उद्धव ठाकरे यांच्या मेव्हण्याच्या म्हणजेच श्रीधर माधव पाटणकर यांच्या मालकीच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. च्या रहिवासी सदनिका आहेत. या सदनिका ठाण्यातील निलांबरी गृहप्रकल्पातील आहेत.