पुणे: ‘यळकोट यळकोट, जय मल्हार’च्या निनादात सोन्याची जेजुरी दुमदुमली. सोमवती अमावस्येनिमित्त राज्यभरातील भाविक खंडेरायाच्या दर्शनासाठी जेजुरीत दाखल झाले आहेत.

वर्षभर खंडेरायाच्या विविध यात्रा भरत असतात. त्यातीलच एक महतवाची म्हणजे सोमवती अमावस्या. या यात्रेसाठी भाविकांनी दोन दिवसांपासूनच जेजुरीत गर्दी केली आहे.



आज पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास, सोहळा सुरु झाला. त्यानंतर कऱ्हा नदीकडे पालखीचे प्रस्थान झाले.

पालखी सोहळा नदी पात्रात पोहचल्यानंतर ‘यळकोट यळकोट जय मल्हार’, सदानंदाचा यळकोट असा खंडोबाचा जयघोष करण्यात आला. भाविकांनी भंडारा खोबऱ्याची मुक्तपणे उधळण केली. कऱ्हा नदीच्या तीरावर लाखो भक्तांच्या साक्षीने देवाच्या पालखीला स्नान घालण्यात आले. दुपारी ही पालखी पुन्हा गडावर पोहचेल.