JEE Main 2023: जानेवारी महिन्याच्या शेवटी होणारी अभियांत्रिकी प्रवेशासाठी होणारी जेईई मेन परीक्षा ही ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार आहे. ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. याचिकेमुळे भलेही 50 हजार विद्यार्थ्यांना फायदा होईल, मात्र त्यासाठी 5 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान करता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार आपलं शिक्षण धोरण जरी योग्य नसलं तरी न्यायालयानं त्यात हस्तक्षेप करू नये असं हायकोर्टानं स्पष्ट केलं आहे. मात्र परिक्षेकरता किमान 75 टक्के गुणांच्या पात्रतेचा निकष शिथिल करण्याची याचिकेतील मागणी कायम ठेवत याचिकेवरील सुनावणी 21 फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली आहे. मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती संदीप मारणे  यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी झाली.


या याचिकेला नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) च्यावतीनं जोरदार विरोध करण्यात आला. एनटीएची बाजू मांडताना एएसजी अनिल सिंह यांनी कोर्टाला सांगितलं की, साल 2019 पासून जेईई मेन ही परीक्षा जानेवारी आणि एप्रिल अश्या दोन सत्रात घेतली जाते. जे विद्यार्थी जानेवारीत चांगले गुण कमवण्यात अपयशी ठरतात ते एप्रिलमध्य पुन्हा प्रयत्न करू शकतात. जानेवारीतील परिक्षेसाठी लाखो विद्यार्थ्यांनी तीन-चार महिने आधीपासून जोरदार तयारी केलेली आहे. त्यामुळे काही जणांच्या मागणीसाठी संपूर्ण परीक्षा पुढे ढकलता येणार नाही.


काय आहे याचिका -


येत्या 24 ते 31 जानेवारीदरम्यान होणारी जेईई मेन ही परीक्षा पुढे ढकलण्यासह आयआयटीमध्ये प्रवेशास पत्र होण्यासाठी 75 टक्के गुणांचा पात्रता निकष शिथिल करावा, अशी मागणी करत वकील आणि सामाजिक कर्यकर्ता अनुभा श्रीवास्तव-सहाय यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. तसेच जेईई मेन परीक्षा घेण्याबाबत आणि परीक्षेच्या पात्रता निकषाबाबत केंद्रीय परीक्षा संस्थेनं (एनटीए) 15 डिसेंबर रोजी काढलेल्या अधिसूचनेलाही याचिकेतून आव्हान दिलेलं आहे. आयआयटीमधील प्रवेशासाठी उच्च माध्यमिक परीक्षेतील किमान 75 टक्के गुणांचा पात्रता निकष उत्तीर्ण गुणांपर्यंत शिथिल करण्यात यावा. मागील वर्षी 75 टक्के गुणांचा पात्रता निकष लागू नव्हता, असंही सहाय यांनी या याचिकेत म्हटलेलं आहे. अचानक करण्यात पात्रता निकषांतील या बदलामुळे लाखो विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसू शकतो, असा दावाही याचिकेतून केलेला आहे.


जेईई परीक्षेच्या कालावधीत 12 वी बोर्डाच्या तसेच विविध राज्य व अन्य परीक्षा मंडळांच्या पूर्वपरीक्षा होणार आहेत. बहुतांश राज्य मंडळांनी जानेवारीमध्ये त्यांच्या पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षांचं वेळापत्रक आखलेलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आयआयटी जेईई मेन ही परीक्षा देणं शक्य होणार नाही. जेईई परीक्षेची घोषणा शेवटच्या क्षणी करण्यात आली असून साधारणपणे वेळापत्रकाच्या तीन-चार महिने आधी परीक्षा जाहीर होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना या परीक्षांच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळतो. परंतु जानेवारीमधील नियोजित मुख्य परीक्षांमुळे विद्यार्थ्यांना जेईईच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळणार नाही, असा दावाही याचिकेतून केला होता.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI