मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज महाराष्ट्र (Maharashtra) दौऱ्यावर येत आहेत. मोदी  अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर (Ahmednagar) येत आहेत. त्यांच्या दौऱ्याची सुरुवात साईबाबांच्या समाधीच दर्शन (Shri Saibaba Sansthan Trust, Shirdi) घेऊन करतील. गुजरातचे मुख्यमंत्री असताना 2008 साली आणि देशाचे पंतप्रधान झाल्यावर 2018 साली नरेंद्र मोदी शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला आले होते. त्यानंतर आज तिसऱ्यांदा ते साईबाबांच्या चरणी नतमस्तक होणार आहेत. 






याच दौऱ्यात पीएम मोदी निळवंडे धरणाच्या (Nalwande Dam) कालव्याचे लोकार्पण करणार आहेत. मात्र, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महाविकास आघाडी सरकारमधील जलसंपदा मंत्री राहिलेल्या जयंत पाटील यांनी पीएम मोदी यांना टोला लगावला आहे. त्यांनी ट्विट करून मोदी यांना खोचक टोला लगावला. 


जयंत पाटील यांनी काय म्हटलं आहे ट्विटमध्ये?


मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रातील शिर्डी येथे विविध विकास कामांच्या पायाभरणी समारंभासाठी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये निळवंडे धरणाच्या कालव्याचे लोकार्पण सुद्धा करण्यात येणार असल्याचे समजले. दुष्काळाच्या छायेत राहणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील गावांना अखेर दिलासा मिळणार आहे, याचा आनंद मला होत आहे. 


1970 ते 2019 पर्यंत निळवंडे धरणाच्या कालव्याच्या कामासाठी सुमारे 1100 कोटी रुपये खर्च करून केवळ45 टक्के काम पूर्ण झाले होते. महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांत कालखंडात जलसंपदा विभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सुमारे 900 कोटींचा निधी देऊन मी या कालव्याचे 90 टक्के काम पूर्ण केले. या प्रकल्पाचे काम गुणवत्तापूर्ण व्हावे यासाठी मी स्वतः या कार्याची तीनदा जाऊन पाहणी केली. महाविकास आघाडी मधील तेथील लोकप्रतिनिधींनी या कामात बारकाईने लक्ष घातले. कोरोनोच्या काळात सरकारी तिजोरीवर आर्थिक भार होता, मात्र त्या परिस्थितीतही आम्ही विकास कामे थांबवली नाहीत. निळवंडे धरणाच्या कालव्याचे काम एका निर्णायक टप्प्यावर आणून ठेवले. 


मोदीजी, आपण फित कापून खुशाल श्रेय घ्यावे. कारण आमच्या शेतकरी बांधवांना, माय भगिनींना आता पाण्यासाठी वणवण करावी लागणार नाही, ह्यात आमचा खरा आनंद सामावलेला आहे.






इतर महत्वाच्या बातम्या