सांगली: आषाढी एकादशीला वारकऱ्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी पूजेला न जाण्याचा निर्णय घेतला. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना निशाणा साधला आहे. ‘पंढरपूरला येणाऱ्या वारकऱ्यांची संख्या ही दहा लाखाच्या घरात आहे. या दहा लाख वारकऱ्यांना चिरडण्याचे सामर्थ्य कुणाच्यात आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला.’

महाराष्ट्रातील समाजांना मुख्यमंत्र्यांनी जी आश्वासने दिली ती त्यांनी पूर्ण करायला हवी होती. पण एखाद्या समाजाला बदनाम करण्याचे किंवा दूषणे देण्याचे सोडून आपण कुठे कमी पडलो यांचे आत्मचिंतन जर मुख्यमंत्र्यांनी केले तर हे सारे प्रश्न सुटायला मदत होईल, असे जयंत पाटील म्हणाले.

महाराष्ट्रच्या आजच्या मुख्यमंत्र्याना या पूजेसाठी जाता येत नाही हे महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याची खंत जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

वारीला न जाण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय

मराठा समाजाच्या भावना लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी पूजेला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. पंढरपुरात दरवर्षी आषाढीला राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजा होते. मात्र यासाठी मराठा समाजाचा विरोध होता.

''महाराष्ट्रात वारीची परंपरा 800 वर्षांपासून आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील याला सरंक्षण दिलं. मुख्यमंत्र्यांनी पूजा करावी ही परंपरा आहे. मी तीन वर्षांपासून जातो. मात्र काही संघटनांनी याला विरोध केला. ही भूमिका चुकीची आहे. विठ्ठलाची पूजा करण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही. संरक्षणात ती केली जाऊ शकते. पण वारकऱ्यांच्या जीवाला धोका होईल म्हणून मी न जाण्याचा निर्णय घेतलाय,'' अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

संबंधित बातम्या :

आषाढी वारी सुरळीत पार पडू द्यावी, उदयनराजेंचं आवाहन

जेव्हा मनोहर जोशी, अजित पवार यांना विठ्ठलाच्या पूजेपासून रोखलं होतं...