मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची कॅबिनेट बैठकीदरम्यान प्रकृती बिघडली असून त्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 


कॅबिनेटची बैठक सुरू असताना त्रास सुरू झाल्यानंतर त्यांना बैठक अर्धवट सोडून रुग्णालयात नेण्यात आले.  ब्रीच कॅण्डी रुग्णालयात तातडीनं ईसीजी करण्यात आलं असून पुढील उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  जयंत पाटीलांसोबत आरोग्य मंत्री राजेश टोपे, मंत्री जितेंद्र आव्हाड, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित  होते. माहिती मिळताच विद्या चव्हाण देखील ब्रिच कॅण्डी रुग्णालयात आल्या आहेत.  पोलिसांचा बंदोबस्त ब्रिच कॅण्डी रुग्णालय परिसरात वाढवण्यात आला आहे.  जयंत पाटील यांची तब्येत सध्या स्थिर आहे. जयंत पाटील यांनी दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबक कोल्हापूरचा दौरा केला होता. 


जयंत पाटील यांच्या ट्विटरवरून देखील प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे. जयंत पाटील म्हणाले,  आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माझी प्रकृती अत्यंत उत्तम आहे. काळजी करण्याचे कारण नाही. नियमित तपासणीसाठी मी रुग्णालयात गेलो होतो. डॉक्टरांनी मला विश्रांती घेण्याची सूचना केली आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. मी लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईल. 






आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, जयंत पाटील यांची तब्येत चांगली आहे. ते सगळ्यांशी बोलत आहे. त्यांचा ईसीजी काढण्यात आला आहे. तसेच 2 डी ईको देखील करण्यात आली आहे. गरज पडल्यास उद्या सकाळी 10.30 वाजता ॲंजिओग्राफी देखील केली जाईल. ईसीजीमध्ये मायनर चेंज आला आहे. त्यामुळे उद्या पुढची प्रक्रिया करण्याचा निर्णय झाला मेडिकल हिस्ट्रीमध्ये त्यांच्या एका आर्टरिमध्ये 50 टक्के ब्लाॅक होता अशी माहिती आहे. त्यामुळे गरज पडल्यास उद्या ॲंजिओग्राफी करण्यात येईल. ब्लाॅक असेल तर ॲंजिओप्लाटी देखील होईल. कार्डिओलाॅजिस्ट देखील आहेत. ते काळजी घेतायत. डाॅक्टर उद्या योग्य निर्णय घेतील.