लष्कराची शिस्त मोडल्याचा आरोप करुन चंदू चव्हाण यांना तीन महिन्याचा कारावास ठोठावल्याची बातमी सकाळी पीटीआयकडून देण्यात आली होती. मात्र, आता याबाबतची नेमकी माहिती समोर आल्यानं चंदू चव्हाण यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जवानानं सीमा पार करुन जाणं, परवानगीविना तळ ओलांडणं हे लष्करात शिस्तबाह्य कृत्य मानलं जातं. त्या कृत्याची कबुली दिल्यानंतर चंदू चव्हाण यांच्यावर शिस्तभंगाची सौम्य कारवाई करण्यात येणार आहे. या कारवाईत चंदू चव्हाण यांना तीन महिने कुठलीही रजा मिळणार नाही. तीन महिन्यांच्या कालावधीनंतर त्याचे रेग्युलर पे, भत्ते, नोकरी फायदे सुरु राहणार आहेत.
मूळ धुळे जिल्ह्यातल्या बोरविहीर गावातील चंदू चव्हाण हे नजरचुकीनं पाकिस्तानच्या हद्दीत गेले होते. त्यानंतर पाकिस्ताननं त्यांना बंदी करुन ठेवलं होतं. भारतानं शर्थीचे प्रयत्न करुन चंदू यांना भारतात परत आणलं होतं.
गेल्या वर्षी भारताने पाकिस्तानवर 28 सप्टेंबरला सर्जिकल स्ट्राईक केला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 29 सप्टेंबरला चंदू चव्हाण नजरचुकीनं पाकिस्तानच्या हद्दीत गेले. मात्र भारत सरकारने पूर्ण ताकद पणाला लावून चंदू चव्हाण यांना या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 21 जानेवारीला भारतात आणण्यात आलं.
कोण आहेत चंदू चव्हाण?
चंदू चव्हाण मूळचे धुळे जिल्ह्यातील बोरविहीर या गावचे आहेत. चंदू 2012 मध्ये सैन्यात भरती झाले. चंदू 37 राष्ट्रीय रायफल्समध्ये तैनात आहेत. 22 वर्षीय चंदू यांनी सीमा ओलांडण्याच्या दोन महिन्यांपूर्वीच राष्ट्रीय रायफल्स जॉईन केलं होतं. चंदू यांचा मोठा भाऊ भूषणदेखील लष्करात आहे. तो सध्या 9 मराठा रेजिमेंटमध्ये कार्यरत आहे.
संबंधित बातम्या :
पाकिस्तानकडून भारतीय जवान चंदू चव्हाण यांची सुटका
पाकच्या तावडीतून सुटलेला जवान चंदू चव्हाण उद्या धुळ्यात परतणार!
भारतीय जवान चंदू चव्हाण आमच्याच ताब्यात, पाकिस्तानची कबुली
22 वर्षांचा चंदू चव्हाण, भाऊही मिलिट्रीत, लहानपणीच आई-वडिलांचं छत्र हरपलं