विनय कोरे महायुतीत, 'स्वाभिमानी'चे राजू शेट्टी नाराज
एबीपी माझा वेब टीम | 26 Oct 2016 07:57 PM (IST)
मुंबई : विनय कोरे यांचा जनसुराज्य पक्षही आता महायुतीत सहभागी झाला आहे. विनय कोरे यांनी यासंदर्भात आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी महायुतीत आपला पक्ष सहभागी झाल्याची घोषणा केली आहे. कुठल्याही अपेक्षेविना महायुतीत आल्याचं विनय कोरेंनी म्हटलं आहे. जनसुराज्य पक्षाचं कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यातल्या स्थानिक स्वराज निवडणुकांवर प्राबल्य आहे. मात्र जनसुराज्य पक्ष महायुतीमध्ये आल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टींनी नाराजी व्यक्त केली आहे. 'जनसुराज्य महायुतीत सामील झाल्याचा निर्णय माध्यमांतून समजला, त्याबाबत चर्चा करण्यात आली नाही. जनसुराज्यचे आमदार-खासदार नाहीत, त्यामुळे प्रवेश म्हणजे नेमकं काय झालं हेच माहित नाही.' असं शेट्टी म्हणाले. त्याचवेळी हरकतही नाही, विरोधही नाही, परंतु स्थानिक पातळीवर एकत्र लढण्याची सुतराम शक्यता नसल्याचं शेट्टींनी स्पष्ट केलं.