पुणे : तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात  (transgender) आणण्यासाठी पुण्यात वेगवेगळ्या उपाययोजना सुरू करण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वी महापालिकेची सुरक्षा 10 तृतीयपंथीयांच्या हाती सोपवली होती. पुण्यातील प्रसिद्ध ससून रुग्णालयात तृतीयपंथीय रुग्णांसाठी स्पेशल वॉर्ड सुरू केलं आणि त्यानंतर आता याच तृतीयपंथीयांना विविध सणांच्या समारंभात समाविष्ठ करुन घेत असल्याचं चित्र आहे. यंदा पुण्यात दहीहंडीसाठी खास तृतीयपंथीयांचं गोविंदा पथक स्थापन करण्यात आलं आहे. हे राज्यातील पहिलंच तृतीयपंथीयांचं गोविंदा पथक आहे. 


इंडिया बुक ऑफ रेकॉर्डकडून दखल घेतली जाणार


पुण्यात एकच नाही तर पुण्यातील विविध भागात चार गोविंदा पथकं स्थापन केले आहेत. यात 100 तृतीयपंथी आहेत आणि प्रत्येक संघात 25 जणांचा सहभाग असणार आहे. हे चार संघ 7 सप्टेंबर रोजी नारायण पेठेतील गोगटे प्रशालेच्या मैदानावर सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास दहीहंडी फोडण्यास सुरुवात करणार आहेत आणि या दहीहंडीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड कडून देखील दखल घेतली जाणार आहे.


आमच्यासाठी सुवर्णसंधी...


आजपर्यंत आम्हा तृतीयपंथीयांना वेगळ्या नजरेने पाहिले जात होते. पण मागील काही महिन्यांपासून आम्हाला सन्मानाची वागणूक मिळत आहे. हे पाहून आनंदाची वाटतो. तसेच आता पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेने तृतीयपंथी यांना सुरक्षा रक्षक होण्याचा मान दिला. त्याबद्दल प्रशासनाचे आभारी आहोत आणि आम्हाला मुख्य प्रवाहात येण्यास यातून मदत झाल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली. आजपर्यंत अनेक सण उत्सवांमध्ये आम्ही सहभागी होत नव्हतो. पण आता गोविंदा पथकात सहभागी होण्यास मिळत आहे. हे पाहून खूप छान वाटते आणि असे उपक्रम राबविण्याची गरज आहे, असं या पथकातील गोविंदा सांगतात. 


पुण्यात दहीहंडी उत्सवाचा जल्लोष


पुण्यात दहीहंडी उत्सवाचा जल्लोष प्रत्येक चौकाचौकात दिसून येतो. पुण्यातील बाजीराव रोड, मंडई, बाबूगेनू हे पुण्यातील मोठे दहीहंडी मंडळं आहेत. त्याशिवाय पुण्यातील विविध चौकात अनेक कार्यकर्त्यांकडून दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा केला जातो. लाखो लोक हा उत्सव पाहण्यासाठी घराबाहेर पडतात. मात्र यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्तदेखील तैनात करण्यात येतो. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस कायम तत्पर असतात किंवा अपघात झाल्यास लवकरात लवकर उपचार मिळावेत यासाठी संपूर्ण सुविधा देण्यात येते. दरवर्षी लाखो रुपयांचे बक्षिसंदेखील देण्यात येतात. 


इतर महत्त्वाची बातमी


Pune Transgender Raju Doiphode : शाळेतील मुलं चिडवायचे म्हणून कीर्तन सोडलं... नंतर घर सोडलं; खाकी वर्दीतील नोकरीबरोबर तृतीयपंथी असलेल्या राजूंना आता कीर्तन का करायचंय?