Jalna Protest : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीचार्जच्या घटनेनंतर आता याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटताना दिसत आहे. शरद पवार यांच्यानंतर आता माजी मुख्यंमत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) देखील जालना येथे जाणार असून, आंदोलकांची भेट घेणार असल्याचे समोर येत आहे. आज संध्याकाळी उद्धव ठाकरे जालन्यात जाणार असल्याची माहिती मिळत आहे. 


मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्याच्या अंतरवाली सराटी गावात गेल्या चार दिवसापांसून मराठा आरक्षणासाठी लढा देणारे कार्यकर्ते मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात उपोषण सुरु होतं. मात्र, शुक्रवारी (01 सप्टेंबर) पोलीस आणि गावकऱ्यांमध्ये झालेल्या वादानंतर दगडफेक आणि लाठीचार्ज करण्यात आला. दरम्यान आता या घटनेचे पडसाद राज्यभरात ठिकठिकाणी उमटताना पाहायला मिळत आहेत. तर ज्या ठिकाणी ही सर्व घटना घडली त्या अंतरवाली सराटी गावात सुरु असलेल्या आंदोलनास्थळी अनेक राजकीय नेतेमंडळी देखील भेटीसाठी जाताना पाहायला मिळत आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे आज या गावात जाणार आहेत. उद्धव ठाकरे हे आंदोलकांची भेट घेतल्यावर अंबड येथील जखमी गावकऱ्यांची भेट घेऊन विचारपूस करणार असल्याची माहिती समोर येत आहे. 


शिवसैनिक आक्रमक! 


मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या जालना येथील आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या घटनेनंतर उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. तर, मुंबईसह राज्यातील अनेक ठिकाणी ठाकरे गटाकडून आंदोलन केले जाणार आहे. त्यामुळे जालना येथील घटनेनंतर राजकीय वातावरण देखील अधिक तापण्याची शक्यता आहे. 


शरद पवार देखील जालन्याच्या दिशेने निघाले... 


जालना येथील घटनेनंतर शरद पवार जालना येथील आंदोलनाच्या ठिकाणी भेट देणार आहेत. तसेच जखमींची देखील भेट घेणार आहेत. यासाठी काही वेळेत शरद पवार औरंगाबादच्या विमानतळावर दाखल होणार आहेत. तेथून ते मोटारीने जालना जिल्ह्याच्या दिशेने रवाना होणार आहे. तर जखमींची भेट घेतल्यावर पवार हे माध्यमांशी संवाद साधण्याची शक्यता आहे. 


पोलिसांचा मोठा बंदोबस्त... 


जालना येथील कालच्या घटनेनंतर आता आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच शहरातील आणि जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात देखील पोलिसांचा बंदोबस्त दिसून येत आहे. शुक्रवारी रात्री अनेक ठिकाणी गाड्या पेटवून देण्यात आल्या होत्या. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून, पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. तसेच पोलीस सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Sharad Pawar : शरद पवार आज जालना दौऱ्यावर, जखमी आंदोलकांची घेणार भेट; अंतवरली सराटी गावालाही देणार भेट