Jalna: राज्यात सध्या मराठा आरक्षण प्रश्नावरून वातावरण चांगलेच तापल्याचं दिसत आहे.  मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) मराठवाडा दौऱ्याला काही ठिकाणी विरोध होत असून आरक्षणासंदर्भात त्यांनी केलेल्या विधानावरुन मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जालन्यात मराठा क्रांती मोर्चाच्या १० ते १२ पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. महत्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यांदरम्यान काळे झेंडे दाखवणे, निदर्शन करत गाड्या अडवल्यास कायदेशी कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. राज ठाकरेंच्या दौऱ्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या साठी पोलीस प्रशासनाच्या वतीने खबरदारी म्हणून हा इशारा देण्यात आलाय.


धाराशिवमध्ये हॉटेलमध्ये घूसत काही मराठा आंदोलकांनी गोंधळ घातल्यानंतर मराठा आरक्षणाचं केंद्रस्थान असलेल्या बीड जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या ताफ्यासमोर सुपाऱ्या फेकून जोरदार आंदोलन केलं.  ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सुपाऱ्या फेकून चले जाव, अशा घोषणाही केल्या. त्यानंतर, राज ठाकरे यांनी पोलीस (Police) अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना याबाबत विचारणा केली आहे. तसेच, यापुढे खबरदारी घेण्याच्या सूचनाही केल्या. त्यानंतर पोलीस प्रशासनाने या नोटीसा बजावल्या आहेत.


मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीसा


विधानसभा निवडणूका आता अवघ्या दोन ते तीन महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. सध्या ते मराठवाडा दौऱ्यावर आहेत. विधानसभेसाठी मनसेच्या उमेदवारांची घोषणा करत असताना मराठा आरक्षणावरून त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे गोंधळ उडाला होता. आता मनोज जरांगेंच्या होमग्राऊंडवर आज राज ठाकरेंचा दौरा असल्याने अनुचित प्रकार टाळण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या 10-12 पदाधिकाऱ्यांना नोटीसा  बजावण्यात आल्या आहेत.


 राज ठाकरेंच्या वक्तव्यावरून गोंधळ


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोलापूर दौऱ्यावर असताना कशाला हवंय आरक्षण? असा सवाल केला होता. यानंतर मराठा समाजात मोठी खळबळ उडाली. राज ठाकरे धाराशिवच्या दौऱ्यावर असताना मराठा आंदोलकांनी हॉटेलमध्ये घूसत गोंधळ घातल्याचेही समोर आले होते. आज ते जालन्यात मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगेंच्या होमग्राऊंडवर दाखल होणार असल्याने अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता १६८ प्रमाणे या नोटीसा बजावल्या आहेत.


हेही वाचा:


बीडमध्ये सुपारी फेकणारे 8 जण ताब्यात; पोलीस अधीक्षकांना राज ठाकरेंचा सवाल, इंटेलिजन्स नाही का?