जालना : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आज सातवा दिवस असून त्यांची तब्येत खालावली असल्याची माहिती आहे. त्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी मराठवाड्याती अनेक जिल्ह्यांमध्ये आंदोलन करण्यात येत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी करत आज मराठा आंदोलकांनी सोलापूर-धुळे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
मराठा आंदोलकांनी सोलापूर-धुळे महामार्ग रास्ता रोको आंदोलन केलं. महामार्गावरील रामगव्हाण फाटा येथे हे आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे यांना समर्थन देण्यासाठी शेकडो मराठा कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याने सोलापूर-धुळे महामार्गावर ट्राफिक जाम झाली आहे.
संभाजीराजेंनी घेतली जरांगेंची भेट
मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा आज सातवा दिवस असून त्यांची तब्येत खालावल्याची माहिती आहे. संभाजीराजे छत्रपतींनी मनोज जरांगेंची भेट घेतली. यावेळी संभाजीराजेंनी सरकारसह विरोधकांवर हल्लाबोल केला. मनोज जरांगेंना काही झाल्यास सरकार आणि विरोधक दोघेही जबाबदार असतील असं संभाजीराजे म्हणाले.यावेळी बोलताना त्यांनी अंतरवाली सराटीमध्ये सुरू असलेल्या ओबीसींच्या आंदोलनावरही टीका केलीय. एकाच गावात दोन आंदोलन करणं ही आपली संस्कृती नसल्याचं संभाजीराजे म्हणाले.
नांदेड बंदला गालबोट, पोलिसांचा विनाकारण लाठीचार्ज
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या नांदेड बंद दरम्यान मराठा आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. दुकाने बंद करण्याचे आवाहन करताना पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने चार ते पाच जण जखमी झाले.
जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ सोमवारी नांदेड बंद पुकारण्यात आला. नांदेड शहरातील शिवाजी पुतळा येथे सकल मराठा बांधव जमा झाले. दुकाने बंद करण्याचे आवाहन करत असताना राज कॉर्नर येथे मराठा आंदोलकांना अडवण्यात आले. या ठिकाणी पोलीस निरीक्षक शेंडगे यांनी आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली.
दुसरीकडे मोर चौक येथे दुकाने बंद करण्याचे आवाहन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या लाठीचार्ज मध्ये चार ते पाच मराठा आंदोलक जखमी झाले. पोलिसांनी विनाकारण लाठीचार्ज केल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
ही बातमी वाचा: