जालना : आईची माया ही अथांग सागरासारखी आणि अमर्याद विस्तीर्ण आकाशासारखी असते, हे आपण का म्हणतो याचा प्रत्यय पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे. काल (रविवारी) जालन्यात विहिरीत कार कोसळून झालेल्या अपघातात आईचं आपल्या मुलांच्या विषयी असलेलं जिवापलीकडचं प्रेम सर्वांच्या मनाला चटका लावून गेलंय.


आभाळाएवढा कागद आणि समुद्राएवढी शाई केली तरी आईचं महात्म्य लिहायला अपुरं पडेल हे सर्व आपण उगाच म्हणत नाहीत. रविवारी जालन्यातील जामवाडी गावात झालेल्या अपघातात आईने आपल्या मुलाला जीवनदान दिले आहे. ही घटना आईच्या महात्म्याची साक्ष देत आहे.


काल जालना देऊळगाव राजा रोडवर शेगावला दर्शनसाठी निघालेल्या कारचा जमवाडी गावाजवळ भीषण अपघात झाला आणि कार थेट विहिरीत कोसळली. यात चार वर्षांची माही फरदडे आणि आरती फरदडे या माय लेकीचा अंत झाला. पण या अपघातात वाचली ती दीड वर्षाची वेदिका. अपघात होऊन गाडी विहिरीच्या दिशेने जात असताना साक्षात काळ समोर दिसल्याची खात्री झाली आणि वेदिकेच्या आईने तिला खिडकीतून बाहेर फेकलं आणि वेदिका वाचली.


अपघाताचा मोठा आवाज झाल्याने गावकरी तिकडे धावले आणि त्यांना हे दिसलं. स्वतःच्या जिवापेक्षा आपल्या तान्हुल्याचा जीवाला दिलेले महत्व हे आईच्या अनंत मायेच दर्शन घडवतं. गाडी बाहेर काढल्यानंतर मागच्या सिटवर बसलेल्या वेदिका आणि तिच्या आईच्या सीटाजवळचं डाव्या बाजूची काच उघडी असल्याचं गावकऱ्यांच्या निदर्शनास आलं. त्या प्रसंगी त्या माउलीने क्षणार्धात घेतलेल्या अचूक निर्णयाची गावकऱ्यांना खात्री झाली. या पुढे गाडीत असलेल्या इतर दोन पुरुषांनी पोहत स्वतःचा जीव वाचवला पण 4 वर्षाच्या चिमुरडीसाठी पुन्हा आईने या विहिरीत दम धरला असेल का? अशी शंका येते.


Jalna Accident | जालन्यात एकाच विहिरीत दोन दिवसात दोन गाड्यांना जलसमाधी, चौघांचा मृत्यू