जळगाव : सिहोरच्या रुद्राक्ष महोत्सवातून जळगावकडे परतताना भाविकांच्या वाहनाला मध्यप्रदेशाजवळ भीषण अपघात झालाय. या अपघातात जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील दोन महिला जागीच ठार झाल्या आहेत. तर चार जण जखमी झाले आहेत. जखमींना धुळे येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शोभाबाई लुकडू पाटील (वय, 52) आणि कमलबाई आत्माराम पाटील (वय, 55 दोन्ही रा. पातोंडा. ता अमळनेर ) अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोन्ही  महिलांची नावं आहेत. मृत दोन्ही महिला एकाच कुटुंबातील आहेत.  


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रुद्राक्ष महोत्सवावरुन घराकडे परतणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांच्या वाहनाचा मध्यप्रदेशात अपघात झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यामधील दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर इतर चार भाविक  जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिकांनी उपचारासाठी धुळे येथील जिल्हा रूग्णालयात दाखल केले आहेत. तेथेच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.  


अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील भाविकांची चार वाहने  13 फेब्रुवारी रोजी सीहोरला शिवकथा महापुराण व रूद्राक्ष महोत्सवासाठी गेले होते. याठिकाणी भाविक दोन ते तीन दिवस थांबले. मात्र रुद्राक्ष घेण्यासाठी झालेली गर्दी आणि चेंगराचेंगरी हे बघून भाविकांचे वाहनं रुद्राक्ष न घेताच पुन्हा जळगावकडे निघाली. गुरुवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास पातोंडा येथील भाविकांची तीन ते चार वाहने जळगावकडे मार्गस्थ झाले. या वाहनांपैकी ( क्रमांक, एमएच 19 डीव्ही 6783 ) एका वाहनावरील चालकाचे पहाटे पाच वाजेच्या सुमारास मध्यप्रदेशातील जुलवानानिया गावाजवळ नियंत्रण सुटले. त्यामुळे वाहनाचा अपघात झाला.


या अपघातात वाहनातील शोभाबाई लुकडू पाटील, कमलबाई आत्माराम पाटील या दोघींचा जागीच मृत्यू झाला. तर इतर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींमध्ये वाहनावरील चालक नितीन मंगल पारधी  (वय 33),  निर्मला विनायक पाटील ( वय 55), राजकुवर नरेंद्र पाटील ( वय 60), मंगल भास्कर पाटील ( वय 54) आणि कमलबाई रतीलाल पारधी ( वय ६० सर्व रा. पातोंडा ता अमळनेर ) यांचा समावेश आहे. जखमींना धुळे येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


मध्य प्रदेशातील सिहोर येथील कुबेरेश्‍वर धाममध्ये पंडित प्रदीप मिश्रा यांच्या रुद्राक्ष व शिवमहापुराण महोत्सवात गुरुवारी पहिल्या दिवशी रुद्राक्ष घेण्यासाठी सुमारे वीस लाख भाविकांची गर्दी उसळल्याने चेंगराचेंगरीसारखी स्थिती उद्भवली. तेथेच अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील महिला गेल्या होत्या. पातोंडा येथून सोमवारी अनेक भाविक सिहोर येथील कुबेरेश्‍वर धाम येथे रवाना झाले होते.