जळगाव: जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात अनिल कपूरच्या नायक सिनेमाची प्रचिती आली. ज्याप्रमाणे नायक सिनेमात अनिल कपूर एक दिवसाचा मुख्यमंत्री होतो, तसंच चिंचोली पिंपरी गावात एक मुलगी एका दिवसासाठी सरपंच झाली.

 

एकीकडे महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढत असताना तिकडे, जळगावमध्ये मात्र महिलांच्या सन्मानार्थ अनोखं चित्र पाहायला मिळालं.

 

बारावीमध्ये 90 टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थिनीला एक दिवसासाठी थेट सरपंचपदी बसवण्यात आलं.

 

महिलांचा सन्मान वाढावा, म्हणून जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील चिंचोली पिंपरी ग्राम पंचायतीने, हा अभिनव उपक्रम राबवला.

 

बारावीत 90 टक्के गुण मिळवणारी भाग्यश्री सोनारने, एक दिवस सरपंच म्हणून गावचा कारभार पाहिला.

 

गावचे सरपंच विनोद चौधरी यांनी ही संधी तिला उपलब्ध करुन दिली. या उपक्रमाचे ग्रामस्थांच्यावतीने स्वागत करण्यात आले.

 

या अगोदर संपूर्ण गावाला मोफत वायफाय आणि RO चे शुद्ध पाणी उपलब्ध करून दिले आहे.