जळगाव : भाजप आणि शिवसेनेने जळगाव महापालिकेत निवडणुकीत अगोदर प्रयत्न केला, मात्र भाजप नेते एकनाथ खडसे यांच्यासह भाजपमधील युतीला अंतर्गत विरोध पाहता ही युती होऊ शकली नाही. त्यामुळे दोन्ही पक्ष मोठ्या ताकदीनिशी समोरासमोर उभे आहेत.
जळगाव महापालिका निवडणुकीसाठी एक ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे जोरदार प्रचार सुरु आहे. जळगाव महापालिकेतील सत्तेचा इतिहास पाहता गेली 40 वर्षे सुरेश जैन गटाकडेच अखंडपणे ही सत्ता असल्याचं पाहायला मिळतं.
या सत्तेला आजपर्यंत कुणीही धक्का लावू शकलं नाही. आताच्या निवडणुकीतही शिवसेनेला बहुमत मिळेल असा विश्वास सुरेश जैन यांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील राजकीय अडथळ्यांच्या पार्श्वभूमीवर जळगाव महापालिकेचा विकास मात्र होऊ शकला नाही.
विविध आरोप आणि घोटाळ्याच्या गर्तेत अडकलेल्या सुरेश जैन यांना आपला राज्यकारभार महापालिकेत सुरळीत चालण्यासाठी सरकारच्या पाठबळाची आवश्यकता भासू लागली आहे. या पार्श्वभूमीवर सुरेश जैन यांनी जळगाव निवडणुकीत शिवसेना आणि भाजपच्या युतीचा प्रस्ताव गिरीश महाजन यांच्या मध्यस्तीमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यासमोर ठेवला.
या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनीही अनुकूलता दाखवली होती. मात्र भाजप नेते एकनाथ खडसे यांच्यासह आमदार सुरेश भोळे आणि कार्यकर्त्यांचा विरोध समोर आल्याने या युतीला मूर्त स्वरूप येऊ शकले नाही, असं बोललं जात आहे.
राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि शिवसेनेचे नेते सुरेश जैन यांच्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मैत्रीपूर्ण संबंध आहेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही नेते युती करण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र युतीसाठी प्रयत्न सुरु असताना गिरीश महाजन यांनी मात्र विविध पक्षातील इच्छुक उमेदवारांना आपल्या गोटात सहभागी करण्याचे प्रयत्न सुरु ठेवले होते.
महाजन यांच्या या प्रयत्नाला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. मनसेच्या महापौरांसह मनसेचे 12 नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच नगरसेवक भाजपात सहभागी झाल्याने भाजपाची ताकद नक्कीच वाढली आहे. गेल्या निवडणुकीत केवळ 15 जागा मिळवणाऱ्या भाजपला यंदा बहुमताने विजयी होण्याचा विश्वास वाटू लागला आहे. मात्र गेली 40 वर्षे अखंड सत्ता असलेल्या सुरेश जैन यांच्या शिवसेनेला ते शह देऊ शकतात का, याकडे सर्वांचं लक्ष आहे.
या निवडणुकीची भाजपकडून सर्वच सूत्र गिरीश महाजन हाताळत असल्याचं चित्र आहे. तर दुसरीकडे एकनाथ खडसे मात्र जळगाव महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेपासून काही अंतरावरच आहेत. गिरीश महाजन यांनी मात्र खडसे आमच्यासोबतच असल्याचा दावा केला आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपकडून सर्वच्या सर्व 75 जागा लढवल्या जात आहेत. तर शिवसेनेकडून 70 जागा लढवल्या जात असल्याने खरी लढत आता शिवसेना आणि भाजपमध्येच दिसणार आहे.
एकीकडे शिवसेना आणि भाजप यांच्यात ‘काटे की टक्कर’ होण्याची चिन्हे असताना त्यांना शह देण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्रितरित्या लढण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसला आजपर्यंत जळगाव महापालिकेत एकही जागा मिळवता आलेली नाही. राष्ट्रवादीला ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपने खिंडार पाडल्याने पक्षाला मोठा हादरा बसला आहे. त्यांना आता किती जागा मिळवता येतात हाच खरा प्रश्न आहे.
विकासाच्या मुद्यावर आपल्याला लोक निवडून देतील असा विश्वास काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना आहे. राष्ट्रवादी 43 जागांवर, तर काँग्रेसने 16 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत.
जळगाव महापालिकेत खरी लढत शिवसेना आणि भाजपातच!
चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव
Updated at:
19 Jul 2018 05:50 PM (IST)
जळगाव महापालिकेत भाजप आणि शिवसेनेकडून युतीसाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र स्थानिक पातळीवरचा विरोध पाहता दोन्ही पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -