जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या मतदार संघातील मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. खडसेंच्या दृष्टीने प्रतिष्ठेच्या असलेल्या जळगावातील या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील मुक्ताई नगर पंचायत निवडणुकीसाठी आज पहिलं मतदान होत आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि 17 नगरसेवकांच्या जागांसाठी ही निवडणूक होत आहे.
नगराध्यक्षपदासाठी एकूण तीन, तर नगरसेवक पदासाठी एकूण 73 उमेदवार रिंगणात आहेत. नगराध्यक्ष पद हे अनुसूचित जाती जमातींसाठी राखीव आहे.
भाजप नेते एकनाथ खडसे यांचा हा मतदारसंघ असल्यामुळे संपूर्ण राज्याचं या निवडणुकीकडे लक्ष असल्याचं पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत भाजपच्या विरोधात शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी अनोखी आघाडी आहे, तर काँग्रेस स्वबळावर लढत आहे. एकूण 23 हजार 726 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
नगराध्यक्षपद हे महिला अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव आहे. त्यासाठी भाजपच्या नजमा तडवी, शिवसेनेच्या ज्योती तायडे आणि काँग्रेसच्या माधुरी जाधव या उमेदवार आहेत.
भाजपने सर्वच्या सर्व म्हणजे 17 जागांवर आपले उमेदवार दिले आहेत. शिवसेनेच्या वतीने 14 , तर राष्ट्रवादीतर्फे तीन उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेसचे सात उमेदवार या निवडणुकीत नशिब आजमावणार आहेत.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलिस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला असून मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. मात्र सुरुवातीच्या काळात अल्प प्रतिसाद असल्याचं पाहायला मिळत आहे