जळगाव : ठाणे आणि चिपळूणमध्ये मराठा क्रांती मोर्चा सुरु असताना तिकडे जळगावातही त्याची धग पहायला मिळत आहे. महाराजस्व अभियानाच्या शिबीराला पोहोचलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मराठा मोर्चाच्या आयोजकांनी निवेदन दिलं आहे.
मराठा समाजाच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष घालण्याची मागणी करण्यात आली आहे. कोपर्डीच्या आरोपींना लवकरात लवकर फाशी व्हावी, मराठा आरक्षण आणि अॅट्रॉसिटी कायद्यात बदलासह काही महत्त्वाच्या मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यापूर्वी त्यांनी यासंदर्भात माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचीही भेट घेतली. महाराजस्व अभियानाअंतर्गत आज जळगावात समाधान शिबिराचं उद्घाटन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसोबतच कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह अनेक मंत्र्यांची उपस्थिती असणार आहे.