जळगाव : एकनाथ खडसे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याचे तीव्र पडसाद जळगावात उमटले आहेत. जळगाव महानगरपालिकेतील भाजपच्या 14 नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत.
एकनाथ खडसेंच्या समर्थनार्थ नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत. त्याचप्रमाणे जळगाव भाजपचे आणखी काही पदाधिकारीही राजीनामे देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही काळापासून खडसेंच्या राजीनाम्याच्या चर्चांना ऊत आल्यानंतर अनेक नगरसेवकांमध्ये खदखद असल्याचं म्हटलं जातं. इतक्या मोठ्या नेत्यावर राजीनाम्याची वेळ आल्याने समर्थक नाराज होते आणि त्यांनी राजीनाम्याची धमकी दिल्याचीही माहिती आहे.
सामूहिक राजीनाम्याने नगरसेवकांनी एकप्रकारे निषेध व्यक्त केला आहे. जळगाव महानगरपालिकेत सुरेश जैन यांच्या खान्देश आघाडीची सत्ता आहे. यानंतर जळगाव भाजपचे आणखी काही पदाधिकारीही राजीनामे देण्याची शक्यता आहे.
जळगावात भाजप कार्यालयात शुकशुकाट, तर शिवसैनिकांनी फटाके फोडले
खडसेंच्या राजीनाम्यानंतर जळगावात भाजप कार्यालयात शुकशुकाट पसरला आहे. मात्र जळगावमधील शिवसैनिकांनी फटाक्या फोडून आपला आनंद साजरा केला. जळगावमध्ये एकनाथ खडसे आणि शिवसेना यांच्यात कमालीचा वाद आहे. त्यामुळेच शिवसैनिकांनी आनंदोत्सव साजरा केला.
मुक्ताईनगरात शुकशुकाट
दरम्यान खडसेंचा बालेकिल्ला असलेला मुक्ताईनगर मतदारसंघातही शुकशुकाट पाहायला मिळत आहे. काही भाजप कार्यकर्त्यांनी रास्ता रोखून निषेध व्यक्त केला आहे. तर काही ठिकाणी दुकानं बंद झाली आहेत.
आजही सांगतो, पुरावे द्या, राजीनाम्यानंतर खडसेंनी ठणकावलं
गेल्या अनेक दिवसांपासून होत असलेल्या बेछूट आरोपांवर कुठलेही पुरावे न देता भाजप सरकारची बदनामी सुरु आहे. त्यामुळेच सगळ्या प्रकरणांची सखोल चौकशी करावी अशी मागणी करत आपण मुख्यमंत्र्यांना राजीनामा सुपूर्द केल्याचं एकनाथ खडसे यांनी सांगितलं. तसंच मी आजही सांगतो, माझ्याविरोधात एकही पुरावा द्या, मंत्रिपद नव्हे तर राजकारण सोडेन, असं आव्हान खडसेंनी दिलं.
खडसेंनी आपल्याकडे असलेल्या महसूल कृषी, पशुसंवर्धन, राज्य उत्पादन शुल्क, दुग्धविकास आणि मस्त्यपालन, अल्पसंख्यांक विकास आणि वक्फ मंत्री ही पदं सोडली आहेत.
भोसरी जमीन खरेदी नियमानुसारच
दुसरीकडे ज्या जमीन प्रकरणावरून खडसेंवर राजीनाम्याची वेळ ओढावली, ती भोसरीतील जमीन खरेदी नियमानुसारच असल्याचा दावा खडसेंनी केला. मात्र ही अवैध ठरवण्याचा प्रयत्न होत आहे. पण या प्रकरणातही कुणीही एकही पुरावा दिलेला नाही, असंही खडसेंनी सांगितलं.