जळगाव : जळगांव जिल्ह्यातील अर्चित राहुल पाटील या बाल वैज्ञानिकला पंतप्रधान बाल संशोधकाचा आज पुरस्कार जाहीर झाल्याच्या नंतर अर्चित पाटील याचं संशोधन देशभरात चर्चेत आले आहे.
जळगाव शहरातील अर्चित पाटील हा काशीनाथ पलोड शाळेचा इयत्ता नववीचा विद्यार्थी आहे. वडील स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत तर आई भूल तज्ज्ञ आहे. घरात दुसरे कोणी नसल्याने अनेकवेळा लहानपणापासून आई वडिलांच्या सोबत राहून त्यांची ऑपरेशन्स पाहण्याची आणि त्यांच्या चर्चा ऐकण्याच्या सवयीमुळे अर्चितला प्रसूती विषयातील अनेक गोष्टी लक्षात आल्या होत्या. याच वेळी प्रसूती पश्चात होणाऱ्या अतिरिक्त रक्तस्त्रावामुळे अनेक मातांचा जीव जात असल्याचे त्याचा लक्षात आले होते. हा जास्तीचा होणारा रक्तस्त्राव जर अगोदरच मोजता आला तर वेळीच उपचार करता येऊन अनेक मातांचे प्राण वाचू शकतात.
हे लक्षात आल्यावर हा रक्तस्त्राव मोजण्यासाठी त्याने आपल्या वडिलांच्या सहकार्याने पी पी एच कप नावचं एक यंत्र तयार केले आहे. या यंत्रामुळे प्रसूती झालेल्या महिलेचा होणारा रक्तस्त्राव हा मोजता येत असल्याने अनेक माहिलांना वेळेवर उपचार मिळून त्यांचा जीव वाचवण्यात यश मिळत असल्याचे समोर आले आहे. पी पी एच कपची उपयोगिता लक्षात आल्यावर त्याच्या या कार्याची पंतप्रधान कार्यालयाने दखल घेत त्याला बाल संशोधनातील दिशा पुरस्कार आता जाहीर केला आहे.
देशभरात निवडक संशोधकांच्या या निवडीत अर्चित पाटीलचे नाव जाहीर झाल्याने जळगाव आणि अर्चित हे दोन्ही चर्चेत आले आहे. मुळातच लहानपणापासून संशोधक वृत्तीच्या अर्चितच्या या यशाने त्यांच्या आई वडिलांनी आनंद व्यक्त केला आहे. त्याच्या या संशोधनासाठी त्यांनी भारत सरकारकडे पेटंट रजिस्टर केले आहे, लवकरच तेही मिळेल अशी त्यांना आशा आहे. अर्चितचे हे संशोधन अनेक प्रसूती झालेल्या मातांसाठी जीवदान देणारे ठरणारे असल्याने त्याच्या या कार्याचा आपल्याला अभिमान आणि आनंद असल्याच म्हटलं आहे. अर्चितचं नाव जाहीर होताच जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते सत्कार केला आहे.
संबंधित बातम्या :