मुंबई: ज्येष्ठ पत्रकार ज्योर्तिमय डे यांनी गुन्हेगारीवर लिहिलेल्या पुस्तकामुळे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनने त्यांची हत्या केल्याचा दावा करणारे आरोपपत्र सीबीआयने शुक्रवारी विशेष न्यायालयात सादर केले. विशेष म्हणजे, या हत्येचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेच्या यादीतील साक्षीदार रवी राम यालाही सीबीआयच्या आरोपपत्रात दोषी ठरवण्यात आले आहे.
आरोपपत्रात राजनसह इतर आरोपींवर हत्या, हत्येचा कट, शस्त्र प्रतिबंधक कायदा व मोक्का अंतर्गत आरोप ठेवण्यात आला आहे. आरोपपत्रात 41 साक्षीदारांचे जबाब आहेत.
11 जून 2011 रोजी जे. डे यांची पवई येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ही हत्या राजनच्या सांगण्यावरून झाल्याचा दावा करत, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पत्रकार जिग्ना वोरा, सतीश काल्या, अभिजित शिंदे, अरूण डाके, सचिन गायकवाड, अनिल वाघमोडे, निलेश शेंडगे, मंगेश अगनावे, विनोद असरानी, पॉलसन जोसेफ व दिपक सिसोडीया यांना अटक करून त्यांच्याविरोधात आरोपपत्रही दाखल केले होते.
छोटा राजनविरोधात महाराष्ट्रात 70 गुन्ह्यांची नोंद आहे. यामध्ये जे. डे यांच्या हत्येचाही समावेश आहे. राजनचा ताबा सीबीआयकडे असल्याने हे प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे हस्तांतरीत करण्यात आले व तशी माहिती न्यायालयाला देण्यात आली.
विशेष मोक्का न्यायाधीश एस. एस. अडकर यांच्यासमोर हा खटला सुरू आहे. मुदत देऊन सीबीआय याचे आरोपपत्र दाखल करत नव्हते. महिन्याभरात याचे आरोपपत्र दाखल झाले नाही, तर गुन्हे शाखेच्या आरोपपत्राच्या आधारे आरोपींवर आरोप निश्चित केले जातील, असा इशारा न्यायालयाने दिला. अखेर शुक्रवारी सीबीआयने हे आरोपपत्र दाखल केले.