नागपूर : नागपुरातील मस्कासाथ परिसरात आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका इमारतीत गेल्या दोन दिवसांपासून गोपनीय चौकशी सुरु केली आहे. तिथे अनेक खासगी लॉकर्स असल्याचं आयकर विभागाच्या लक्षात आलं आहे.

विशेष म्हणजे महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील पिंपरेवाडा टोल नाक्याजवळ तेलंगणा पोलिसांनी 19 ऑक्टोबर रोजी एका गाडीतून 10 कोटी रुपये जप्त केले होते. तेलंगणामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस सीमेवर नाकाबंदी करत वाहनांची तपासणी करत होते. त्या दरम्यान केए46 एम 6095 या क्रमांकाच्या ब्रीझा कारमध्ये पाच पोत्यांमध्ये भरलेले 10 कोटी रुपये पोलिसांना सापडले होते.

ही रक्कम नागपूरच्या मस्कासाथ परिसरातून आणल्याचं कारचालकाने पोलिसांना सांगितलं होतं. त्यानंतर तेलंगणा पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर आयकर विभागाने ही कारवाई केली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून आयकर अधिकाऱ्यांनी मस्कासाथ परिसरात एका इमारतीवर लक्ष केंद्रीत करत चौकशी सुरु केली होती. अत्यंत गुप्तरित्या सुरु असलेल्या या चौकशीमध्ये आयकर अधिकाऱ्यांना मस्कासाथ परिसरातल्या त्या इमारतीत एक नव्हे तर अनेक लॉकर्स सापडल्याची माहिती आहे. त्यामुळे या इमरतीतून अनेक व्यापाऱ्यांसाठी खाजगी लॉकर सेवा तर पुरविली जात नव्हती ना, याची चौकशी आयकर विभाग करत आहे. तसंच या खाजगी लॉकर्समध्ये कोणकोणत्या व्यापाऱ्यांचे, नेत्यांचे घबाड लपवले आहे का याची चौकशीही आयकर अधिकारी करत आहेत.

या इमारतीशिवाय नागपुरातील कळमना, सतरंजीपुरा आणि रामदासपेठ परिसरात ही प्रत्येकी एका ठिकाणी चौकशीचे काम सुरु असल्याचे आयकर विभागातील सूत्रांनी सांगितले आहे.