सोलापूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागीत 8 रेल्वे स्थानकांना ISO मानांकन प्राप्त झालं आहे. एनएबीसीबी मान्यता प्राप्त बोर्डाद्वारे या स्थानकांचे लेखापरीक्षण करण्यात आले होते. त्यानुसार सोलापूर विभागातील अहमदनगर, दौंड, कोपरगाव, लातूर, कलबूर्गी, शिर्डी, वाडी आणि कुर्डूवाडी या रेल्वे स्थानकांचा यात समावेश आहे. याआधी सोलापूर रेल्वे स्थानकाला ISO मानकांन देण्यात आले आहे. त्यामुळे सोलापूर विभागातील एकूण आठ रेल्वे स्थानकं आता मानाकंन प्राप्त करणारी झाली आहेत.


सप्टेंबर 2019 मध्ये सोलापूर रेल्वे स्थानकास ISO 14001 मानांकम प्रदान करण्यात आले होते. त्यानंतर विभागातील इतर रेल्वे स्थानकात देखील राष्ट्रीय हरित लवादाच्या मार्गदर्शक तत्वानुसार महत्वपूर्ण बदल करण्यात आले. ज्यात स्थानकाच्या छतावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करणे, प्लॅटफॉर्मवरील कव्हर शेडवर सौरउजेचे पॅनल बसवणे, प्लॅस्टिकमुक्त स्थानक बनवणे, यांत्रिकिकृत साफसफाईचा वापर करणे, कचऱ्याचे नियोजन, वॉटर आणि उर्जा ऑडिट, ध्वनिप्रदूषण इत्यादी बाबींचा समावेश होता. दोन वेळेस आयएसओ कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी या रेल्वे स्थानकांचे निरीक्षण केले. त्यानंतर हे प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती वरिष्ठ वाणिज्य मंडळ प्रंबधक प्रदीप हिरडे यांनी दिली.


हे प्रमाणपत्र तीन वर्षांसाठी वैध असणार आहे. या काळात आयएसओ 14001 च्या मानकाचे पालन या रेल्वे स्थानकांना करावे लागणार आहे. नियमित अंतराने प्रमाणित संस्था स्थानकांचे लेखापरीक्षण करतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे प्रमाणपत्र सोलापूर विभागाला ऑनलाईन पाठवण्यात आले असून लवकरच त्याची प्रत पोस्टाने प्राप्त होणार असल्याची माहिती देखील प्रदीप हिरडे यांनी दिली.


आता सोलापूर जिल्ह्यातून ही धावणार किसान रेल्वे!


दरम्यान 21 ऑगस्ट 2020 पासून नाशवंत कृषी मालाच्या वाहतुकीसाठी किसान रेल गाडीची सेवा सोलापूर विभागात देखील सुरु करण्यात येणार आहे. सोलापूर आणि पुणे विभागातील कोल्हापुर, सांगली, सोलापूर, पुणे, अहमदनगर परिसरात डाळींब, केळी, द्राक्षे, इत्यादी फळे, भाजीपाला तसेच शेती मालाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात येते. त्यामुळे या मार्गावर देखील किसान रेल्वे सुरु होणार असल्याने शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.


ही किसान रेल्वे कोल्हापुरातून निघेल त्यानंतर मिरज, सांगोला, पंढरपूर, कुर्डुवाडी, दौंड आणि अहमदनगर या स्थानकावर थांबेल. सदर गाडीचे डब्बे गाडी क्र. 00107/00108 देवलाली-मुझफ्फरपूर-देवलाली गाडीला मनमाड रेल्वे स्थानकावर जोडले व काढले जातील. यामुळे प्रयागराज चौकी, न्यू चौकी (अलहाबाद चौकी), दिनदयाल उपाध्य (मुगलसराय), बक्सर, दानापुर (पटणा) आणि मुझफ्फरपूर यापरिसरात नाशवंत कृषी माल पाठवण्यात येईल. यामुळे शेतकरी आणि व्यापाराचा माल सुरक्षित आणि जलद गती पोहोचवण्यात येईल.


किसान रेल्वे गाडी क्र. 00109 कोल्हापूर ते मनमाड ही गाडी कोल्हापुरहून 21 ऑगस्ट-2020 ते 25 सप्टेंबर-2020 ( प्रत्येक शुक्रवारी) रोजी सकाळी 05.30 वाजता प्रस्थान होईल आणि गाडी क्र. 00110 मनमाड ते कोल्हापूर ही गाडी मनमाडहून 23 ऑगस्ट-2020 ते 27 सप्टेंबर-2020 (प्रत्येक सोमवारी) रोजी रात्री 08.00 वाजता प्रस्थान होईल. या पार्सल विशेष गाडीमध्ये कोणत्याही पॅसेंजरना प्रवेश देण्यात येणार नाहीये. प्रस्थान स्थानक आणि मार्गातील स्थानकावर प्रवाशांनी यात्रा करू नये तसेच मध्य रेलवे सोलापूर विभागतील शेतकऱ्यांनी आणि उद्योगजांनी या किसान रेल पार्सल गाडीचा लाभ घ्यावा, असे आवाहन वरिष्ठ वाणिज्य मंडळ प्रंबधक प्रदीप हिरडे यांनी केले आहे.