परभणीतून अटक नासेरबिन चाऊस बॉम्ब बनवण्याच्या तयारीत
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद | 21 Jul 2016 07:27 AM (IST)
औरंगाबाद : आयसिसच्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन अटक झालेल्या परभणीच्या नासेरबिन चाऊसनं बॉम्ब बनवण्याची तयारी पूर्ण केल्याची माहिती आहे. एटीएसने औरंगाबाद कोर्टात याबाबत माहिती दिली आहे. नांदेड, औरंगाबाद, हैदराबाद हे नासेरबिन चाऊसचं टार्गेट असल्याचीही माहिती आहे. त्या बॉम्बचे छायाचित्र सिरीयातला दहशतवादी फारुकला पाठवण्यात आलं होते. चाऊसला हा बॉम्ब बनवण्यासाठी हवाला मार्फत पैसे मिळाले होते. परभणीतील गाडीवान मोहल्ल्यातून नासिरबिन अबूबकर याफई उर्फ चाऊस या 21 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली होती. गेल्या आठवड्यात अचानक या मुस्लीमबहुल वस्तीत एटीएसचं पथक दाखल झालं आणि त्यांनी नासेरबिनला अटक केली. कोण आहे नासेरबिन? नासेरबिन हा दहशतवादी संघटना आयसिसच्या संपर्कात होता असा एटीएसचा आरोप आहे. रमजानच्या महिन्यात त्यानं मोठा घातपात घडवण्याचा कट आखला होता, अशी माहिती एटीएसच्या सुत्रांनी दिली आहे. नासेरबिनवर लावेलेले सर्व आरोप त्याच्या कुटुंबियानं फेटाळले आहेत.