सोलापूर : जगातील देशांची नावे, त्यांच्या राजधान्या, त्यांचे क्षेत्रफळ, नद्या, विविध वैशिष्ट्य यांची माहिती वर्षानुवर्षे अभ्यास करुणही लक्षात राहणार नाही. मात्र सोलापूर जिल्ह्यातील एका पाच वर्षांच्या चिमुकलीच्या ही माहिती तोंडपाठ आहे.


माळशिरस तालुक्यातील श्रीपूर गावात किराणा दुकान चालवणारे विनोद गाढवे यांची ही मुलगी आहे. ईश्वरी ही त्यांची मोठी मुलगी आहे. वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच तिने वडिलांना व्यायाम करताना पाहून कुस्तीचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. पण या छोट्याशा मुलीसोबत कुस्ती खेळायला मैत्रिणी नसल्याने वडिलांनी घराजवळच कुस्तीचा आखाडा बनवला.

वयाच्या चौथ्या वर्षापासून तिने कराटे शिकण्यास सुरुवात केली आणि वर्षातच 3 गोल्ड मेडल मिळविले. ईश्वरीला व्यायामासोबतच वयाच्या चौथ्या वर्षी अभ्यासाची आवड लागली. त्यामुळे तिच्या वडिलांनी तिला जनरल नॉलेजचे प्रश्न आणि उत्तर सांगण्यास सुरुवात केली. सांगितलेले सर्व प्रश्नांची उत्तरे तिला लगेच लक्षात राहत असल्याचं पाहून वडिलांनी तिला रोज 25 ते 30 प्रश्न आणि त्यांची उत्तरे सांगण्यास सुरुवात केली.

चिमुकल्या ईश्वरीला वाचताही येत नाही आणि लिहिताही येत नाही. त्यामुळे तिला प्रश्न आणि उत्तर दोन्ही तोंडीच सांगावं लागतं. मग मात्र तिला रोजच नवीन प्रश्न लागू लागल्यावर वडिलांना ते एक कामच लागलं. सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा जनरल नॉलेजच्या पुस्तकातून नवीन प्रश्न काढून द्यायचे आणि तिला ते सांगायचे. मात्र हळूहळू सांगितलेले सर्वच प्रश्न आणि उत्तरे ती तासाभरात मुखोद्गत करू लागल्यावर तिला थोडे अवघड प्रश्न द्यायला सुरुवात केली पण त्या प्रश्नांचाही ईश्वरी असाच फडशा पडू लागल्यावर आता वडिलांच्या समोर ईश्वरीच एक प्रश्न बनू लागली आहे.

ज्या वयात मुलांना त्यांचं नावही नीट सांगता येत नाही, त्या वयात ईश्वरी जगातील 50 देशांची नावं असोत किंवा जगातील 21 नद्यांची नावं असोत, आपल्या बोबड्या भाषेत ज्या पद्धतीने सांगते ते पाहता तिच्या बुद्धीची भूक अचाट तर आहेच पण त्या बुद्धीला चांगल्या पद्धतीने प्रशिक्षण मिळाल्यास त्याचा भविष्यात मोठा फायदा होईल.

ईश्वरी सध्या श्रीपूरमधील इंदिराबाई आगाशे इंग्लिश स्कूलमधील बालवाडीतील मोठ्या वर्गात जाते. मात्र तिला कोणत्याही भाषेतील कविता सांगितली तर तिची ती कविता लगेच पाठ होते, असं तिच्या शिक्षिका सांगतात.

मुंबईतील एका डॉक्टरांनी ईश्वरीच्या मेंदूची तपासणी केल्यावर त्यांनीही लाखात एखाद्याला अशी बुद्धिमत्ता लाभते, असा अहवाल दिला आहे.