नाशिक :   काही दिवसांपूर्वी सिंचन घोटाळा प्रकरणात (irrigation scam) एका राष्ट्रवादीच्या नेत्याला अटक होणार आहे असा दावा करणारं ट्वीट भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी केला  त्यानंतर आता सिंचन घोटाळा प्रकरणात निवृत्त अधिकारी विजय पांढरे यांची एन्ट्री झाली आहे. गेल्या दहा वर्षात सिंचन घोटाळ्याची चौकशीच झाली नाही, असा दावा विजय पांढरे यांनी केला आहे. विजय पांढरे हे जलसंपदा विभागातील माजी अधिकारी आणि घोटाळा समोर आणणारे अधिकारी आहेत.


विजय पांढरे म्हणाले,  सिंचन घोटाळा अनिल देशमुख, नवाब मलिक आणि संजय राऊत यांच्या घोटाळ्यापेक्षा  मोठा घोटाळा आहे. असे असताना देखील गेल्या नऊ - दहा वर्षापूर्वी सिंचन घोटळा उघडकीस आला असून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. केवळ कारवाई होते असा नाटक करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात जे गुन्हेगार आहे त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.  


चितळे समितीने याबाबतीत सर्व अहवाल सादर केला आहे. नागपूर खंडपीठासमोर परमबीर सिंग यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात अजित पवार यांना क्लिनचीट देण्यात आली मात्र खंडपीठाने ती अद्यापही मान्य केली नाही. भ्रष्टाचाराचे प्रकरण रेंगाळणे हे चांगल्या लोकशाहीचे लक्षण नाही, असे  देखील पांढरे या वेळी म्हणाले.


 अजित पवारांना 2019 साली सिंचन घोटाळ्यातून क्लीन चिट देण्यात आली होती. परमबीर सिंह यांनी ही क्लीन चिट दिली होती. पण तो अहवाल अद्याप मुंबई उच्च न्यायालयाने स्वीकारला नसल्याचं समोर आलं आहे. दोन वर्षांच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने हा अहवाल स्वीकारला नसल्याचं समोर आलं आहे.


 भाजपचे (BJP) नेते मोहित कंबोज यांनी केलेल्या ट्वीटमुळे खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठ नेता लवकरच अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना भेटणार आहे, असं मोहित कंबोज यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.  अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे दोघेही सध्या मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात आहेत. 


कोण आहेत विजय पांढरे?


 जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा तालुक्यातल्या पहूर गावचे पांढरे ज्युनिअर इंजिनिअर म्हणून जलसिंचन खात्यात कामाला लागले. 30 वर्षांच्या  सरकारी नोकरीत त्यांनी त्यांचं काम सचोटीनं आणि निडरपणे केलं. अजित पवारांसारख्या  नेत्याच्या राजीनाम्याला अप्रत्यक्ष कारणीभूत ठरलेले विजय पांढरे पांढरेंना मनोरुग्ण ठरवण्यामागचं प्रयत्न केला होता.