पोलादपूर बस दुर्घटना : रायगड : पावसाळा असो वा उन्हाळा... महाबळेश्वर हा पर्यटकांचा बारमाही आवडता पिकनिक स्पॉट आहे. रत्नागिरीच्या दापोलीतील कृषी विद्यापीठाचे कर्मचारी शनिवारी महाबळेश्वरला फिरायला निघाले आणि वाटेतच आंबेनळी घाटात त्यांच्या बसला अपघात झाला. 30 प्रवाशांचा बळी घेणारा पोलादपूर आणि महाबळेश्वर दरम्यान असलेला हा 'शॉर्टकट'च प्रवाशांसाठी मृत्यूचा मार्ग ठरल्याचं समोर आलं आहे.

महाबळेश्वरला निघालेले 31 कर्मचारी रायगड जिल्ह्यातील पोलादपूर ते महाबळेश्वर असा प्रवास करत होते. रायगड जिल्ह्यातून जाणारा हा  शॉर्टकट रत्नागिरी, रायगड आणि सांगली जिल्ह्यातील पर्यटकांसाठी नित्याचाच. पोलादपूर ते महाबळेश्वर दरम्यान असलेला 35 किलोमीटरचा प्रवास हा आंबेनळी घाटातून करावा लागतो. दापोलीहून निघालेले प्रवासी देखील याच मार्गाने प्रवास करत होते. समुद्रसपाटीपासून सुमारे 1600 फूट उंच असलेल्या या घाटात अनेक ठिकाणी धोकादायक वळणं आहेत.

यावेळी आंबेनळी घाटातील अरुंद रस्त्यावरुन प्रवास करत बसमधील प्रवासी धबधब्यावर थांबून पुढे निघाले होते. धबधब्यापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर आंबेनळी घाटातील एका वळणाच्या पुढे आल्यावर चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस दरीत कोसळली.

दापोलीहून निघालेली खाजगी बस ही पोलादपूरपासून 17 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका वळणाच्या पुढे जाऊन सुमारे 500 ते 600 फूट खोल दरीत कोसळली आणि बसमधील 30 प्रवाशांचा मृत्यू झाला.

एनडीआरएफ आणि महाड, माणगाव, महाबळेश्वर येथील ट्रेकर्सच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.

अपघातातून थरारकरित्या बचावलेले प्रकाश सावंत-देसाई खोल दरीतून वर आले. मोबाईलला रेंज मिळाल्यानंतर कोकण कृषी विद्यापीठाला फोन करुन त्यांनी अपघाताची माहिती दिली. सावंत-देसाई हे कोकण कृषी विद्यापीठाचे अधीक्षक आहेत.

पिकनिकचा प्लान

महिन्याचा चौथा शनिवार आणि रविवार अशी सलग सुट्टी असल्यामुळे कर्मचारी दापोलीहून महाबळेश्वरला पिकनिकला निघाले होते. यासाठी त्यांनी विद्यापीठाचीच बस भाड्याने घेतली होती. मात्र बस रायगडमधील पोलादपूर घाटात आल्यावर दरीत कोसळली.

दरवर्षी भाताची लावणी झाल्यानंतर कृषी विद्यापीठातील कर्मचारी पिकनिकला जातात. त्याप्रमाणे हे कर्मचारी काल (शनिवारी) सकाळी साडेसहाच्या सुमारास दापोलीहून महाबळेश्वरला जाण्यासाठी निघाले. परंतु साडेदहा वाजता कर्मचाऱ्यांची बस दरीत कोसळल्याचा फोन आम्हाला आल्याची माहिती कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार संचालक संजय भावे यांनी दिली.

खोल दरीत बस कोसळल्यामुळे बसचा चेंदामेंदा झाला. इतकंच नाही तर मृतदेहांची अवस्थाही छिन्नविछिन्न झाली आहे.



रेंज आली आणि अपघाचा थरार कळवला

या अपघातातून प्रकाश सावंत देसाई आश्चर्यकारकरित्या बचावले. प्रकाश देसाई हे कसेबसे 800 फूट दरीतून वर आले. वर आल्यानंतर रस्त्यावर त्याच्या मोबाईलला रेंज आली, त्यानंतर त्यांनी सर्वात आधी या अपघाताची माहिती कोकण कृषी विद्यापीठाला कळवली. आमची बस दरीत कोसळली, आम्हाला मदत करा, अशी माहिती प्रकाश सावंत-देसाई यांनी दिली.

या अपघाताची माहिती त्या कर्मचाऱ्याने दिली नसती, तर हा अपघात झालाय हे समजण्यास अनेक तास-दिवस लागले असते. कारण अपघात झाला, ते ठिकाण अवघड वळणाचं किंवा अपघातग्रस्त ठिकाण नव्हतं.

वाचलेल्या कर्मचाऱ्याने अपघाताची माहिती मिळाल्यानंतर, दापोली कृषी विद्यापीठाच्या प्रशासनाने त्याची माहिती पोलिसांनी दिली. सर्वात आधी महाबळेश्वर पोलीस आणि पोलादपूर पोलिस घटनास्थळी पोहोचले. मात्र त्यांना नेमका अपघात कुठे झाला, हेच कळत नव्हतं. बस नेमकी कुठून खाली कोसळली आणि ती बस दरीत कुठे आहे, हेच शोधण्यात पोलिसांचा वेळ गेला. अखेर पोलिसांना बस कोसळलेलं ठिकाण आणि ठिपक्याएवढी बस दिसली आणि रेस्क्यू ऑपरेशन सुरु झालं.

पिकनिक रद्द केलेल्या कर्मचाऱ्याची प्रतिक्रिया

अपघातातील मृतांची नावे

1. संदीप भोसले
2. प्रमोद शिगवण
3. पंकज कदम
4. संजीव झगडे
5. निलेश तांबे
6. संतोष झगडे
7. रत्नाकर पागडे
8. दत्तात्रय धायगुडे
9. हेमंत सुर्वे
10. सचिन गुजर
11. राजाराम गावडे
12. राजेश सावंत
13. रोशन तबीब
14. सुनील साठले
15. संतोष जालगावकर
16. राजेंद्र बंडबे
17. संदीप सुवरे
18. सचिन गिम्हवणेकर
19. सुयश बाळ
20. सचिन झगडे
21. प्रमोद जाधव
22. रितेश जाधव
23. विक्रांत शिंदे
24. सुनील कदम
25. जयवंत चौगुले
26. विनायक सावंत
27. राजेंद्र रिसबूड
28. किशोर चौगुले
29. संदीप झगडे
30. प्रशांत भांबीर

एकमेव बचावले - प्रकाश सावंत देसाई

संबंधित बातम्या


पोलादपूर घाटात बस दरीत कोसळली, 30 जणांचा मृत्यू  


प्रकाश देसाई दरीतून वर आले, रेंज आल्यावर अपघाताची माहिती दिली!  


पोलादपूर बस दुर्घटना : बायकोने थांबवलं म्हणून जीव वाचला, प्रवीण रणदिवेंची पहिली प्रतिक्रिया 


पोलादपूर दुर्घटना: राष्ट्रपती, पंतप्रधान, राहुल गांधींनी व्यक्त केलं दु:ख