बीड : "अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी जे येतात त्यांनाच मी जास्त मारते. अनुसूचित जातीमधील 21 व्यक्तींना फोडून काढले आहे," असे धक्कादायक वक्तव्य एका महिला IPS अधिकाऱ्याने केले आहे. माजलगावच्या डीवायएसपी भाग्यश्री नवटके यांच्या बेताल वक्तव्याची एक व्हिडीओ क्लीप वायरल झाली आहे. या वक्तव्याचे निषेध व्यक्त करण्यात येतोय.

या प्रकारामुळे IPS अधिकारी आणि माजलगावच्या डीवायएसपी असलेल्या भाग्यश्री नवटके यांच्यावर सर्व स्तरातून टीकेचा भडीमार होत आहे. नवटके यांच्याविरोधात दिलेल्या तक्रारीनुसार सोमवारपर्यंत गुन्हा दाखल न झाल्यास न्यायालयात जाणार असल्याचा इशारा बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबूराव पोटभरे यांनी दिला आहे.

भाग्यश्री नवटके या व्हिडीओ क्लिपमध्ये काही लोकांशी बोलताना असे म्हणत होत्या की, "तुम्ही मराठा आहेत म्हणून मी फक्त तुमच्या पाठीवर मारते, जर दलित असते तर मी त्यांना फोडून काढले असते." एका प्रकरणात अॅट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल होता. आरोपी सवर्ण होता. त्याला अटक करण्याऐवजी मदत कशी केली आणि दलितांना धडा कसा शिकवला याबद्दलही या क्लिपमध्ये त्या सांगत आहेत.

भाग्यश्री नवटके यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करुन त्यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी बाबूराव पोटभरे यांनी पोलीस महासंचालकांकडे केली आहे.